पत्नीचा खून करून फरार झालेल्या पतीला अटक

By Admin | Updated: July 14, 2016 01:50 IST2016-07-14T01:44:09+5:302016-07-14T01:50:39+5:30

रेल्वे पोलिसांची कामगिरी : पोलीस कोठडीत रवानगी

Arrested husband killed by wife | पत्नीचा खून करून फरार झालेल्या पतीला अटक

पत्नीचा खून करून फरार झालेल्या पतीला अटक

नाशिकरोड : वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उंडओहोळ शिवारात मच्छिमार सुखदेव रामचंद्र मोरे (४६) याने पत्नी गुलाबबाईसोबत भांडण करून मारहाण केली. मारहाणीत गुलाबबाईचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह येथील शेतात पुरून संशयित आरोपी मोरे हा फरार झाला होता. मिळालेल्या गुप्त माहितीवरून रेल्वे पोलिसांनी त्याला क्रमांक एकच्या फलाटावर ताब्यात घेतले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोरे हा उंडओहोळच्या वस्तीवर कुटुंबासमवेत राहत होता. मद्य पिऊन घरगुती कारणावरून मोरे याने पत्नीसोबत वाद घालत मारहाण केली होती. या मारहाणीत गुलाबबाईचा रात्री मृत्यू झाला. घटनेची माहिती कोणाला होऊ नये म्हणून, जवळच्या शेतात मोरे याने मयत गुलाबबाईचा मृतदेह पुरला आणि धूम ठोकली. मिळालेल्या गुप्त माहितीवरून मोरे हा नाशिकरोड रेल्वेस्थानकावर असल्याची बाब सहायक पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी नाशिकरोड रेल्वेचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पवार यांच्याशी संपर्क साधून कळविली. त्यांना व्हॉट्स अ‍ॅपवरून फरार मोरेचे छायाचित्र पाठविले. त्यानंतर पवार यांनी प्रकाश कुलकर्णी, सुभाष कुलकर्णी, सत्यभामा चव्हाण, प्रमोद जाधव, विनीत वाघमारे यांच्या मदतीने रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक एकच्या नवीन पुलाच्या परिसरात सापळा रचला. पुलाखाली मोरे हा बसलेला असताना या रेल्वे पोलीस पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.
त्यानंतर वाडीवऱ्हे पोलिसांनी रेल्वेस्थानकावर येऊन मोरे यास अटक केली. मोरे याने गुन्ह्णाची कबुली दिली असून त्यास इगतपुरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने येत्या सोमवारपर्यंत (दि. १८) पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Arrested husband killed by wife