सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By Admin | Updated: April 4, 2017 00:55 IST2017-04-04T00:55:01+5:302017-04-04T00:55:12+5:30
मालेगाव : वनजमिनीत अनधिकृतपणे विहिरी खोदून शेतपंप बसवून पाण्याचा उपसा करणाऱ्या सहा शेतकऱ्यांविरुद्ध येथील वनविभागाने कारवाई केली आहे

सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मालेगाव : तालुक्यातील सायतरपाडे शिवारातील वनजमिनीत अनधिकृतपणे विहिरी खोदून शेतपंप बसवून पाण्याचा उपसा करणाऱ्या सहा शेतकऱ्यांविरुद्ध येथील वनविभागाने कारवाई केली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आठ शेतपंप, स्टार्टर, वायरी जप्त केल्या आहेत.
तालुक्यातील सायतरपाडे शिवारातील कम्पार्ट क्रमांक ४४७ च्या वनजमिनीत गुलाब बंडू अहिरे, यशवंत पर्वत सावकार, भाऊसाहेब सुदाम सावकार, मीनाबाई पंडित देसले, समाधान राजाराम पाटील, बाळासाहेब आनंदा पाथरे आदि शेतकऱ्यांनी बेकायदेशीररीत्या विहिरी खोदून त्यावर वीजपंप ठेवून पाण्याचा उपसा सुरू केला असल्याची तक्रार राकेश लोंढे यांनी शासनाच्या आपलं सरकार पोर्टलवर तसेच येथील वनविभागाच्या कार्यालयात केली होती. त्यानुसार वनपाल व्ही. एस. बोरसे, वनरक्षक अहिरे, गोवेकर, सागर पाटील, वनसेवक कांतीलाल वाळके, बाळू जाधव, बापू जाधव, चैत्राम खैरनार आदिंच्या पथकाने या शेतकऱ्यांच्या विहिरींवर छापा टाकून आठ विहिरींचे पंप, स्टार्टर व वायरी जप्त केल्या आहेत. वनविभागाची कुठलीही परवानगी घेतली नसल्यामुळे त्यांच्याविरुद्ध वनजमिनीची नासधूस व वन्यजीव प्राण्यांसाठी असलेला पाण्याचा साठा कमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनविभागाने त्यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. (प्रतिनिधी)