नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्त्येच्या सूत्रधारांना अटक करा
By Admin | Updated: August 21, 2015 00:39 IST2015-08-21T00:33:18+5:302015-08-21T00:39:33+5:30
मागणी : अंधश्रद्धा निर्मूलन समितीची निदर्शने

नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्त्येच्या सूत्रधारांना अटक करा
नाशिक : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्त्येला दोन वर्षे पूर्ण होऊनदेखील अद्याप तपासाला गती मिळालेली नाही. हत्त्येचा कट रचणारे सूत्रधार अद्यापही मोकाट असून, त्यांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
पुरोगामी विचारधारा मांडणारे व रूढ करणारे दाभोलकर यांची हत्त्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी लांच्छनास्पद बाब आहे. राज्य सरकारची पोलीस यंत्रणा या हत्त्येच्या तपासात अयशस्वी ठरल्याने न्यायालयाने पुढील तपासाची सर्वस्वी जबाबदारी केंद्रीय अन्वेषण गुन्हे विभागावर सोपविली; मात्र तरीदेखील प्रगती झाल्याचे अद्याप जाणवत नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. याबाबत मुख्यमंत्री, पंतप्रधान, गुन्हे विभागाचे प्रमुखांशी वारंवार पत्रव्यवहार केला; मात्र त्याचा कुठलाही परिणाम झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे संपूर्ण राज्यात याबाबत अस्वस्थता व उद्वेगाची भावना कायम असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिकपणे याकडे लक्ष देऊन तातडीने या राज्यातील पुरोगामी विचाराच्या जनतेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनावर महेंद्र दातरंगे, सुधीर धुमाळ, कृष्णा चांदगुडे, दिलीप सुकेणकर, अण्णा हिंगमिरे, राजेंद्र फेगडे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)