वीज वितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला लाच घेताना अटक
By Admin | Updated: October 14, 2015 23:37 IST2015-10-14T23:36:15+5:302015-10-14T23:37:35+5:30
वीज वितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला लाच घेताना अटक

वीज वितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला लाच घेताना अटक
मालेगाव : तालुक्यातील दाभाडी येथील वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयात कनिष्ठ अभियंता सचिन सखाराम पवार यांना आज दुपारी पंधराशे रुपये लाच घेताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
आघार (खु।।) येथील शेतकऱ्याने गट नंबर ५४९ येथे वीजजोडणीसाठी अधिकृतरीत्या मागणी केलेली होती. त्यासाठी कागदपत्राची पूर्तता केल्यानंतरही वीज वितरण कार्यालयाने वीजजोडणी दिली नाही म्हणून त्याने पिके वाया जात असल्याचे पाहून वीज वितरण कंपनीच्या तारांवर आकडा टाकून वीज घेतली असता तीन ते चार दिवसांपूर्वी त्याला पवार यांनी पकडले होते. या प्रकरणी एकतर दंड भरण्याची किंवा गुन्हा दाखल करण्याची कारवाई टाळण्यासाठी पवार यांनी तीन हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यात पंधराशे रुपयात तडजोड करण्यात आली होती. शेतकऱ्याने नाशिकच्या लाचलुचपत विभागाच्या दूरध्वनीवर तक्रार केली असता नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अशोक कर्पे व त्यांचे सहकारी हवालदार दिलीप ढुमणे, पोलीस शिपाई विलास वाघ यांनी सापळा रचत आज दुपारी चारच्या सुमारास पवार यांना दाभाडी येथे लाचेची रक्कम स्वीकारताना पकडले. (वार्ताहर)