लष्कर पेपरफूट : नाशकातील तीन संशयिताना अटक
By Admin | Updated: February 28, 2017 02:33 IST2017-02-28T02:33:41+5:302017-02-28T02:33:57+5:30
नाशिक : लष्करभरती परीक्षेच्या पूर्वसंध्येलाच प्रश्नपत्रिका फुटल्याने ठाणे गुन्हे शाखेने राज्यातील विविध ठिकाणांहून २१ संशयिताना अटक केली आहे़

लष्कर पेपरफूट : नाशकातील तीन संशयिताना अटक
नाशिक : लष्करभरती परीक्षेच्या पूर्वसंध्येलाच प्रश्नपत्रिका फुटल्याने ठाणे गुन्हे शाखेने राज्यातील विविध ठिकाणांहून २१ संशयिताना अटक केली आहे़ त्यामध्ये नाशिकमधील संदीप बबन नागरे (३२,रा़ वऱ्हेदारणा, ता़निफाड, जि़ नाशिक), किरण अशोक गामणे (३२, रा. वऱ्हेदारणा, ता. निफाड, जि़ नाशिक) हे दोघे नाशिकमधील नाशिककर करिअर अकॅडमीचे संचालक, तर संदीप दौलत भुजबळ
(२६, रा़ बिटको पॉइंट नाशिकरोड) हा विद्यार्थी आहे़ या सर्व संशयितांना ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़
लष्करभरतीसाठी देशभरात रविवारी (दि़२६) लेखी परीक्षा होणार होती़ मात्र परीक्षेच्या आदल्या दिवशीच प्रश्नपत्रिका फुटल्याचे ठाणे गुन्हे शाखेने उघडकीस आणले़ ठाणे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, अकोला, वर्धा व नाशिक येथील २१ संशयितांना अटक केली आहे़ यामध्ये माजी सैनिक, विविध करिअर अकॅडमीचे संचालक, लष्करातील जवान, अधिकारी तसेच विद्यार्थ्यांचाही समावेश आहे़
लष्कर पेपरफुटी प्रकरणात नाशिकच्या नागरे, गामणे व भुजबळ या तिघांचा समावेश आढळून आल्याने अटक करण्यात आली आहे़ प्रत्येकी चार ते पाच लाख रुपयांना या प्रश्नपत्रिकेची विक्री करीत असल्याचे समोर आले आहे़ यातील संशयितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे़ दरम्यान, या संशयितांना ठाणे येथील न्यायालयात हजर केले असता ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)