सेना नगरसेवकांची ‘धडधड’ वाढली...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2016 23:55 IST2016-05-06T23:35:18+5:302016-05-06T23:55:43+5:30

औरंगाबाद : महापालिकेच्या कारभाराची ‘आर्थिक’ गणिते सांभाळणाऱ्या स्थायी समितीमधून आठ सदस्य मागील आठवड्यात निवृत्त झाले.

Army corporators 'thrashing' increased ...! | सेना नगरसेवकांची ‘धडधड’ वाढली...!

सेना नगरसेवकांची ‘धडधड’ वाढली...!

औरंगाबाद : महापालिकेच्या कारभाराची ‘आर्थिक’ गणिते सांभाळणाऱ्या स्थायी समितीमधून आठ सदस्य मागील आठवड्यात निवृत्त झाले. या रिक्त पदांवर वेगवेगळ्या पक्षांतील नगरसेवकांची वर्णी लागणार आहे. शिवसेनेतील एकच सदस्य स्थायी समितीमध्ये जाणार आहे. समितीत जाणाऱ्या सदस्याच्याच गळ्यात सभापतीपदाची माळ पडणार हेसुद्धा निश्चित आहे. सेनेत एका जागेसाठी तीन दिग्गज नगरसेवक रिंगणात आहेत. तिघांचेही ‘हार्टबीट’ सध्या वाढलेले आहेत.
शिवसेना-भाजपच्या युतीनुसार यंदा स्थायी समिती सभापतीपद सेनेच्या वाट्याला आले आहे. स्थायीमध्ये सेनेचे एकूण ६ सदस्य आहेत. सोडत पद्धतीत ज्योती पिंजरकर या एकमेव सदस्याची चिठ्ठी काढण्यात आली. त्यामुळे पिंजरकर स्थायीतून बाहेर आल्या आहेत. त्यांच्या जागेवर आपली वर्णी लागावी म्हणून ज्येष्ठ नगरसेवक विकास जैन, नंदकुमार घोडेले आणि राजू वैद्य या तिघांनी कंबर कसली आहे. सेनेतील स्थानिक आणि वरिष्ठ नेत्यांकडे तिघांनीही जोरदार फिल्डिंग लावली आहे.
शुक्रवारी महापौर त्र्यंबक तुपे यांनी मंगळवार, दि.१० मे रोजी सकाळी १० वाजता विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. या सभेत स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. प्रत्येक पक्षाचे गटनेते स्थायीमध्ये कोणत्या नगरसेवकाला पाठवायचे याची यादी महापौरांना सादर करणार आहेत. सेनेतील इच्छुक उमेदवारांना स्थायी समिती सदस्य म्हणून उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी वेळही अत्यंत कमी आहे. सोमवार, दि.९ मेपर्यंत पक्षश्रेष्ठींकडून यासंदर्भात निर्णय होईल, असा अंदाज लावण्यात येत आहे. स्थायी समिती सदस्यपद मिळविणारा सेनेचा सदस्य सभापती होणार आहे. त्यामुळे या निवडीला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे.
विकास जैन : १९९५ पासून विकास जैन नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. २००५ मध्ये त्यांच्या पत्नी निवडून आल्या होत्या. जैन यांनी महापौरपद, स्थायी समिती सभापतीपदही सांभाळले आहे. औरंगाबाद मध्यमधून त्यांना एकदा विधानसभेची उमेदवारीही पक्षाने दिली होती.
नंदकुमार घोडेले : २००० पासून घोडेले महापालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. २००५ आणि २०१० मध्ये त्यांच्या पत्नी अनिता घोडेले निवडून आल्या. कबीरनगर वॉर्डातून त्या अपक्षही निवडून आल्या होत्या. नंतर सेनेने त्यांना थेट महापौरपद दिले होते. घोडेले यांनी एकदा स्थायी समितीपदही सांभाळले आहे.
राजू वैद्य : वैद्य हेसुद्धा २००० पासून सतत निवडून येत आहेत. त्यांनी महापालिकेत एकदा स्थायी समिती सभापतीपद भूषविले. पक्षाने त्यांना शिक्षक मतदारसंघातून एकदा उमेदवारी दिली होती. सध्या सेनेचे शहराध्यक्षपद आणि महापालिकेत गटनेता ही महत्त्वाची पदे त्यांच्याकडे आहेत.

Web Title: Army corporators 'thrashing' increased ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.