सेना-भाजपात जुंपली !
By Admin | Updated: December 24, 2016 01:35 IST2016-12-24T01:34:45+5:302016-12-24T01:35:02+5:30
शिवस्मारक भूमिपूजन : भाजपाचे वीस हजार कार्यकर्ते जाणार

सेना-भाजपात जुंपली !
नाशिक : मुंबईत अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सेना-भाजपात श्रेयवादाची लढाई सुरू असतानाच भाजपाने सेनेला डावलून गुरुवारी वाजत-गाजत केलेल्या गोदावरी जलकलश मिरवणुकीच्या उपक्रमाने शिवसेना दुखावली आहे. शिवसेनेने भाजपाच्या या उपक्रमाबद्दल ‘निव्वळ स्टंटबाजी’ अशी संभावना केली आहे, तर भाजपानेही प्रत्त्युत्तर देत छत्रपती शिवराय ही काय कुणा एका पक्षाची मक्तेदारी नसल्याचा टोला लगावला आहे. शिवस्मारकावरून सेना-भाजपात जुंपल्याने आगामी महापालिका निवडणुकीत संभाव्य युतीबाबतही तर्कवितर्क लढविले जात आहेत.
शनिवारी (दि.२४) मुंबईत अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय भव्य स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याचा जंगी कार्यक्रम भाजपाने आखला आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर, भाजपाने देशभरातील नद्यांचे जल तसेच महाराष्ट्रातील विविध गड - किल्ल्यांवरील माती मागवत ती स्मारकाच्या ठिकाणी अर्पण करण्याचा उपक्रम निश्चित केला. त्यानुसार, गुरुवारी नाशिकमधून गोदावरीचे पवित्र जल आणि जिल्ह्यातील साल्हेर-मुल्हेर किल्ल्यावरील माती यांचा एक कलश मुंबईला वाजत-गाजत मिरवणुकीने रवाना केला. त्यासाठी रामकुंडावर जाहीर जलपूजनाचाही कार्यक्रम घेतला गेला. परंतु, या कार्यक्रमाला मित्रपक्ष शिवसेनेचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. भाजपाने वाजत-गाजत केलेल्या या उपक्रमामुळे शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी संतापले असून, भाजपाला उशिरा का होईना छत्रपतींची आठवण झाल्याचा टोला लगावला आहे. भाजपाने गुरुवारी केलेला कार्यक्रम हा निव्वळ स्टंटबाजी असल्याचेही सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे, तर भाजपाने याबाबत प्रत्युत्तर देत छत्रपतींचे नाव घेणाऱ्यांना कोणत्याही निमंत्रणाची गरज नाही. कार्यक्रम सार्वजनिक असल्याने सर्वांसाठी तो खुला होता, असे स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, भाजपाने शनिवारी होणाऱ्या सोहळ्यासाठी नाशिकमधून सुमारे २० ते २५ हजार कार्यकर्ते घेऊन जाण्याचे नियोजन केले आहे. या नियोजनाची धुरा प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार वसंत गिते यांच्याकडे सोपविण्यात आली असून, गिते यांनी शुक्रवारी प्रभागनिहाय भेटी देऊन प्रत्येक प्रभागातून जास्तीत जास्त कार्यकर्ते मुंबईला घेऊन जाण्यासंबंधी सूचना केल्या. सुमारे दोनशे ते अडीचशे बसेस नाशिकमधून जाणार असल्याचा दावा भाजपाने केला आहे, तर शिवसेनेनेही आपलेही पदाधिकारी व कार्यकर्ते शिवरायांना वंदन करण्यासाठी जाणार असल्याचे म्हटले आहे. शिवस्मारकाच्या निमित्ताने सेना-भाजपात जुंपल्याने त्याचे परिणाम निवडणुकीतील युतीवरही होतील काय, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.