सेना-भाजपात वितुष्ट; महाआघाडी संतुष्ट
By Admin | Updated: April 13, 2016 23:33 IST2016-04-13T23:20:23+5:302016-04-13T23:33:48+5:30
प्रभाग समित्यांवर वर्चस्व : दोन सदस्यांच्या अपात्रतेचाही लाभ

सेना-भाजपात वितुष्ट; महाआघाडी संतुष्ट
नाशिक : विभागीय आयुक्तांनी पक्षांतर बंदी कायद्यान्वये मनसेच्या दोन नगरसेवकांना अपात्र ठरविल्याने बंडखोरांनी घेतलेला धसका तसेच सेना-भाजपातील वितुष्ट याचा लाभ सत्ताधारी महाआघाडीने उठविला आणि सहापैकी पाच प्रभाग समित्यांवर आपले वर्चस्व सिद्ध केले. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत समीकरणे बदलण्याची भाकीते केली जात असताना सहाही समित्यांवर निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडण्याचा करिश्मा पाहायला मिळाला.
गेल्या दोन दिवसात महापालिकेच्या सहाही प्रभाग समितीच्या सभापतिपदाचा निवडणूक कार्यक्रम कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे जोरात वाहत असल्याने प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीकडे राजकीय स्तरावर लक्ष लागून होते. काही नगरसेवकांनी प्रभाग सभापतिपदावर डोळा ठेवत पक्षांतर केले होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच विभागीय आयुक्तांनी मनसेचे नीलेश शेलार व शोभना शिंदे या दोन नगरसेवकांना पक्षांतर बंदी कायद्यान्वये अपात्र ठरविण्याचा निकाल दिल्याने बंडखोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले शिवाय पक्षांतर करण्याच्या तयारीत असलेल्या काही नगरसेवकांची पावलेही अडखळली. या निकालाचा सत्ताधारी मनसेने पुरेपूर लाभ उठविण्याचे ठरविले आणि सहाही प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत सदस्यांना व्हिप बजावण्याची मोहीम यशस्वीपणे पार पाडली. त्यामुळे अपात्रतेचा धसका घेतलेल्या सदस्यांवर उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की ओढवली. अपात्रतेच्या निकालाने महाआघाडीचा उत्साह दुणावला असतानाच सेना-भाजपातील वितुष्टही महाआघाडीच्या विजयाची वाट सोपी करत गेले.
शिवसेनेने भाजपाविरोधी काढलेला मोर्चा आणि त्यानंतर महिला मेळाव्यात केलेला हल्ला यामुळे दुखावलेल्या भाजपाने सिडकोत सेनेला मदत न करण्याचा पवित्रा घेतला तर त्याचे उट्टे सेनेने पश्चिम, पूर्व विभागात अनुपस्थित राहून काढले. दोन दिवसात घडलेल्या घडामोडींमुळे सातपूरला मनसेच्या सविता काळे, सिडकोत कॉँग्रेसच्या अश्विनी बोरस्ते, पश्चिम विभागात कॉँग्रेसचे शिवाजी गांगुर्डे, नाशिक पूर्वमध्ये राष्ट्रवादीच्या नीलिमा आमले आणि पंचवटीत मनसेचे रुची कुंभारकर यांची सभापतिपदी बिनविरोध निवड होत सहापैकी पाच ठिकाणी महाआघाडीने प्रतिकूल परिस्थिती असतानाही आपले वर्चस्व सिद्ध केले, तर नाशिकरोड प्रभाग सभापतिपदी सेनेचे पूर्ण बहुमत असल्याने सूर्यकांत लवटे बिनविरोध निवडून आले. भाजपाची मात्र पुरती फजिती झाल्याचे बघायला मिळाले. (प्रतिनिधी)