सेना, भाजपकडून उमेदवार निश्चित

By Admin | Updated: June 9, 2014 00:19 IST2014-06-09T00:16:32+5:302014-06-09T00:19:11+5:30

पोट निवडणूक : हालचालींना वेग; मनसे, कॉँग्रेसमध्ये शांतता

Army, BJP candidate | सेना, भाजपकडून उमेदवार निश्चित

सेना, भाजपकडून उमेदवार निश्चित

 

नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ आणि ६१ या दोन प्रभागातील रिक्त जागांसाठी उमेदवारांची चाचपणी अंतिम टप्प्यात असून, सोमवारी दोन्ही प्रभागाच्या इच्छुकांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रभाग क्रमांक १७ मधून भाजपाकडून दिनकर पाटील यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे, तर प्रभाग ६१ मधून केशव पोरजे यांच्या नावावर एकमत झाल्याचे सूत्रांकडून समजते.
प्रभाग क्रमांक १७ मधील कॉँग्रेसचे नगरसेवक दिनकर पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी बहुजन समाज पार्टीत प्रवेश केला होता; तर प्रभाग ६१ चे मनसेचे नगरसेवक हेमंत गोडसे यांनी भगवा हाती घेत शिवसेनेत प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढविली. त्यामुळे या दोघाही नगरसेवकांनी राजीनामा दिल्यामुळे या पोटनिवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या वतीने नाशिकरोड तसेच नाशिकमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
नाशिकरोडमधील प्रभाग क्रमांक ६१ च्या जागेसाठी शिवसेनेकडून अनेक इच्छुकांनी मुलाखती दिल्या. यामध्ये केशव पोरजे, शिवनाथ हांडोरे, प्रभाकर पाळदे, महेंद्र पोरजे, धनंजय पाटील आणि विश्वास हांडोरे यांनी दावा सांगितला. उमेदवारीबाबत इच्छुकांमध्येच एकमत व्हावे, यासाठी प्रयत्न करण्यात आले; मात्र कुणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने आमदार बबनराव घोलप आणि खासदार हेमंत गोडसे यांच्यावर अंतिम निर्णय सोपविण्यात आला. काही वेळेतच पोरजे यांच्या नावावर एकमत झाल्याची चर्चा पसरली. अधिकृत घोषणा अद्यापही करण्यात आलेली नाही.
सातपूर येथील प्रभाग १७ मधील जागा दिनकर पाटील हेच लढवतील, अशीच एकूण परिस्थिती आहे. पाटील यांचा भाजपाप्रवेश झाल्यानंतर त्यांच्या नावाची उद्या औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. इतर पक्षांकडून अद्याप कोणतीही चाचपणी करण्यात आली नसली तरी त्यांची भूमिका वेट अ‍ॅण्ड वॉचची असल्याचे दिसून येते. येथील जागेसाठी माजी नगरसेवक सदाशिव माळी यांनी उमेदवारी अर्ज नेला आहे; मात्र राष्ट्रवादी पक्षाकडून कुणाचेही नाव निश्चित करण्यात आलेले नाही. इतर आणखी दोन-तीन इच्छुकांनी अर्ज नेले आहेत. इकडे कॉँग्रेसकडून अजून तरी कुणीही येथील जागेवर लढण्याची तयारी दर्शविलेली नाही. मात्र सेनेकडून साहेबराव जाधव आणि चंदा उफाडे यांनी इच्छुक म्हणून मुलाखत दिलेली आहे. यापूर्वी या दोघांनी निवडणूक लढविली आहे.
येत्या मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याने सर्वांचे लक्ष उमेदवारी अर्जावर लागले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Army, BJP candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.