सेना, भाजपाच्या स्पर्धेत इतर पक्ष झाकोळले
By Admin | Updated: February 24, 2017 01:44 IST2017-02-24T01:44:21+5:302017-02-24T01:44:36+5:30
कार्यकर्त्यांचा जल्लोष : नाशिकच्या निकालाबरोबरच राज्याकडेही लक्ष

सेना, भाजपाच्या स्पर्धेत इतर पक्ष झाकोळले
नाशिक : राज्यातील दहा महानगरपालिकांमध्ये शिवसेना आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांच्या कामगिरीकडेच संपूर्ण राज्याचे लक्ष असल्याने निवडणुकीतील इतर पक्षांची कामगिरी झाकोळून गेली आहे. नाशिकमध्येही केवळ सेना आणि भाजप या दोनच पक्षांच्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे मनसे, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीची चर्चाही होऊ शकली नाही. लहान पक्ष आणि इतर आघाड्यांचा तर या झंझावातात टिकाव लागू शकला नाही.
महापालिका निवडणुकीत परिवर्तन घडविण्याच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली होती. सेना आणि भाजपाची युती तुटल्यानंतर राज्यात शिवसेना मोठा पक्ष असेल आणि नाशिकमध्येही शिवसेनाच सर्वाधिक जागा जिंकेल, असा अंदाज बांधला जात होता. परंतु जसाजसा निकाल हाती येऊ लागले तसतसे चित्र बदलत गेले आणि अखेरच्या निकालापर्यंत सेना-भाजप या दोहोंमधील रस्सीखेचकडेच सर्वांचे लक्ष वेधले गेले. नाशिकप्रमाणेच राज्यातील इतर महापालिकांमध्येही भाजपाने जोरदार मुसंडी मारल्याने भाजपाच्या या लक्षवेधी कामगिरीने सारेच अचंबित झाले. नोटाबंदी, मराठा मोर्चाकडून बहिष्काराची भाषा, तिकिटासाठीचा घोडेबाजार, प्रचारातील घसरलेला स्तर याचा कोणताही परिणाम भाजपाच्या निकालावर दिसला नाही.
नाशिकमध्ये सेनेने ११२ तर भाजपाने ११९ जागांवर उमेदवार उभे केले होते. मनसे ९७, राष्ट्रवादीने ५४, बसपाने ३२, माकपने १४, भाकपने २, एमआयएमने ९, समाजवादी पार्टीने ३, भारिपने १४, रिपाइंने ८, रिपाइं सेक्युलरने ४, रासपने ५, आंबेडकर राइट पार्टीने २, संभाजी ब्रिगेडने २, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने ३, भारतीय संग्राम परिषदेने ६, जनसुराज्य पक्षाने १ तर भारतीय जनहित कॉँग्रेसने १ याप्रमाणे उमेदवार उभे केले होते. परंतु सेना- भाजप वगळता इतर कोणत्याही पक्षाची चर्चाच शहरात होऊ शकली नाही.
राष्ट्रवादी आणि कॉँग्रसने यश संपादन केले आहे. राष्ट्रवादीने पाच तर कॉँग्रेसने सहा ठिकाणी विजय मिळविला. मात्र त्यांचा विजयही झाकोळला गेला. इतर पक्षांना आपल्या विजयापेक्षा सेना- भाजप यांच्या जागांमध्ये किती वाढ होते आणि सत्तेच्या जवळ कोण पोहचतो याचीच अधिक काळजी दिसून आली. वास्तविक राष्ट्रवादी आणि कॉँग्रेस पक्षाचा विजय हा या पक्षांच्या नेत्यांपेक्षा स्थानिक उमेदवारांच्या प्रभावावरच झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाही मात्र पक्ष म्हणून या विजयाची फारशी दखल घेण्यात आली नाही.