३० तलवारींसह शस्त्रसाठा जप्त
By Admin | Updated: October 2, 2014 00:17 IST2014-10-01T23:22:58+5:302014-10-02T00:17:18+5:30
३० तलवारींसह शस्त्रसाठा जप्त

३० तलवारींसह शस्त्रसाठा जप्त
मालेगाव - येवला पोलिसांनी संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत ३० तलवारी, दोन पिस्तुल व तीन जिवंत काडतुस असा शस्त्रसाठा जप्त करून दोघांना अटक केली.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा शस्त्रसाठा सापडल्याने याप्रकरणी कसुन चौकशी करण्यात येत असल्याचे मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दोन दिवसांपूर्वी याविषयी गुप्त माहिती कडासने यांना मिळाली. त्यांनी याप्रकरणाची आपल्या सुत्रांकडून माहिती घेतली. सदर तलवारींची विक्री करण्यात येणार असल्याचे समजल्यानंतर एक बनावट ग्राहक तयार करण्यात आला. सदर ग्राहक आणि तलवारी बाळगणारा मतीन अब्दुुल हमीद (२०) रा. परदेशपुरा, येवला यांच्यात मंगळवारी मध्यरात्री बोलणी झाली. येवला बसस्थानकामागे सौदा करण्याचे पक्के झाले. सदर कारवाईसाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली. एक पथक बसस्थानकामागे मध्यरात्री एकवाजेपासून दबा धरुन बसले तर दुसऱ्या पथकाने संशयित आरोपी मतीनच्या घराजवळ पाळत ठेवली. मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास संशयित आरोपी मतीन एका पोत्यात २६ तलवारी व एक तलवार स्वत:च्या पाठीला शर्टच्या आत लावून बसस्थानकामागे आला. बनावट ग्राहक आणि संशयित आरोपी मतीन समोरासमोर येताच दबा धरुन बसलेल्या पोलिस पथकाने त्यांच्यावर छापा मारला. त्यावेळी संशयित आरोपी मतीन शर्टात लपविलेली तलवार काढून पोलिस उपनिरीक्षक धीरेंद्र बिलवाल यांच्यावर हल्ला केला. त्यांनी तलवारीचा वार आपल्या हातावर झेलला तर पथकातील पोलिसांनी आरोपी मतीनच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या चौकशीतून या प्रकरणात दुसरा आरोपी सर्फराज खान महेबुब खान याचाही समावेश असल्याचे उघड झाले. त्यानंतर मतीनच्या घरातून दुसऱ्या पथकाने पिस्तुल व तीन काडतुसे जप्त केले.
ही कारवाई पहाटेपर्यंत चालली. दुसरा आरोपी सर्फराज याच्या ताब्यातून तीन तलवारी जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी दोघा आरोपींना अटक करण्यात आली. मतीनला येवला येथील न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली. तर सर्फराज यास गुरुवारी न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे. सदर शस्त्रसाठयामागे येवल्यातील लिंबु गॅँग व बोंबिल गॅँग यांच्यातील अंतर्गत वाद असल्याची प्राथमिक माहिती आहे.