साधुग्रामला सशस्त्र वेढा
By Admin | Updated: July 28, 2015 01:53 IST2015-07-28T01:48:49+5:302015-07-28T01:53:59+5:30
हाय अलर्ट : आखाडे, वाहनांची कसून तपासणी; ठिकठिकाणी पोलीस तैनात

साधुग्रामला सशस्त्र वेढा
नाशिक / पंचवटी : पंजाबमधील गुरुदासपूर येथील पोलीस ठाण्यावर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने नाशकातही हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, विशेष करून महिन्यावर येऊन ठेपलेल्या सिंंहस्थ कुंभमेळ्याच्या शाही पर्वणीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण साधुग्रामला जवानांनी सशस्त्र वेढा देतानाच आखाड्यांच्याही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. नाशिक शहरात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर कसून वाहन तपासणी व संशयितांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
सोमवारी सकाळीच या संदर्भातील आदेश पोलीस आयुक्तालयाला प्राप्त झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच तपोवनातील साधुग्रामच्या सुरक्षा व्यवस्थेत बदल करण्यात आला. विशेष करून साधुग्रामकडे येणाऱ्या रस्त्यावर तपोवन क्रॉसिंग, मिरची ढाबा चौक, जयशंकर लॉन्स, टाकळी रस्ता, लक्ष्मीनारायण पूल या प्रमुख मार्गावर लोखंडी बॅरिकेडिंग टाकून सशस्त्र जवानांना तैनात करण्यात आले. साधुग्राममध्ये शिरू पाहणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी व वाहनातील नागरिकांचीही विचारपूस केल्यानंतरच त्यांना प्रवेश देण्यास सुरुवात झाली. पंजाबमध्ये दहशतवाद्यांनी रेल्वे रुळांवर तसेच महत्त्वाच्या ठिकाणी स्फोटके पेरल्याच्या पार्श्वभूमीवर साधारणत: बारा वाजेच्या दरम्यान बॉम्ब शोधक व नाशक पथकाला साधुग्राममध्ये पाचारण करण्यात येऊन त्यांच्याकरवीही संपूर्ण साधुग्रामची तपासणी करण्यात आली. प्रत्येक सेक्टरमध्ये जाऊन अधिकाऱ्यांनी सुरक्षिततेचा आढावा घेतला त्यानंतर प्रमुख आखाड्यांमध्येही सुरू असलेल्या कामांच्या साहित्याचीही तपासणी करण्यात आली.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राममध्ये साधू-महंतांचे दाखल होणे सुरू होऊन हजारो भाविकही त्यांच्या दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. १९ आॅगस्ट रोजी आखाड्यांच्या ध्वजारोहणासाठी अनेक अति महत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले आहे व २९ आॅगस्टला पहिली पर्वणी आहे. पंजाबमधील दहशतवादी घटना पाहता अतिरेकी कोणत्याही वेषात येऊन हल्ला करू शकतात हे स्पष्ट झाले असल्याने आत्तापासूनच त्यादृष्टीने काळजी घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तपोवनातील लक्ष्मीनारायण मंदिर व दिगंबर आखाड्याच्या प्रवेशद्वारावर सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आला आहे.