लोहोणेर : गणेश विसर्जन शांततेत व सुरळीतपणे पार पडावे म्हणून पोलीस उप अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी लोहोणेर गावांतून सशस्त्र पोलीस संचलन करून लॉग मार्च काढण्यात आला. लोहोणेर येथे गिरणा नदीच्या पात्रात देवळा ,सटाणा शहरातील विविध गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीसह लोहोणेर ठेंगोडा गावासह लगतच्या सुमारे दहा - बारा खेड्यातील लहान - मोठ्या बाप्पाच्या मूर्ती विसर्जनासाठी येत असतात. काल पासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने गिरणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढला आहे. अशा परिस्थितीत कोणताही अनर्थ घडू नये. श्रीचे विसर्जन शांततेत पार पडावे म्हणून लोहोणेर येथे लॉंग मार्चचे आयोजन करण्यात आले असल्याचे पोलीस उप अधीक्षक सदाशिव वाघमारे यांनी सांगितले. यावेळी लोहोणेर गावातून मिरवणूक मार्गावर सशस्त्र पोलीस संचलन करण्यात आले. गिरणा नदी पात्रात पुलाच्या पूर्व बाजूला विसर्जन स्थळाची पोलिसांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी वाघमारे यांनी लोहोणेर ग्रामस्थांसह विसर्जनस्थळी मदत कार्य करणाऱ्या किशोर भागडीया व लोहोणेर येथील कार्यकर्त्यांशी सविस्तरपणे चर्चा करून श्रींच्या विसर्जनाबाबत कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण होऊ नये म्हणून सूचना केल्या. यावेळी देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खंडेराव रदवे, पी. एस. आय. अशोक निकम, पोलीस उपनिरीक्षक मातोंडकर,, पोलीस कॉन्स्टेबल निलेश सावकार, आदीसह सर्व पोलीस शिपाई, होमगार्ड, तलाठी अंबादास पुरकर, रमेश आहिरे, योगेश पवार, किशोर भागडीया, नाना जगताप आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे सशस्त्र संचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 16:18 IST