वास्तुविशारदांनी दिला पालिकेला पाणी बचतीचा सल्ला
By Admin | Updated: October 5, 2015 23:53 IST2015-10-05T23:52:26+5:302015-10-05T23:53:00+5:30
वास्तुविशारदांनी दिला पालिकेला पाणी बचतीचा सल्ला

वास्तुविशारदांनी दिला पालिकेला पाणी बचतीचा सल्ला
नाशिक : महापालिकेच्या वतीने शहरात होणाऱ्या पाणीपुरवठ्यात ३५ ते ४० टक्के गळती होत असून, ती कमी करण्यासाठी प्रबोधन आणि सक्तीचा मार्ग अवलंबताना फेडरल जोडणी ते मीटर याठिकाणापर्यंत लक्ष पुरवल्यास तूट कमी होऊन पाणी बचत होऊ शकते, असा सल्ला वास्तुविशारदांच्या संघटनेने दिला आहे.
जागतिक वास्तुशास्त्र दिनाच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या वतीने नीलेश सोनवणे, पंकज पुंड, नीलेश वाघ, रसिक बोथरा आणि रोहिणी मराठे यांनी उपमहापौर गुरुमितसिंग बग्गा यांना निवेदन दिले. यात स्मार्ट सिटीच्या दृष्टीने अशा अनेक सूचना करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या वतीने गंगापूर धरण आणि दारणा नदीतून ५ जलशुध्दीकरण केंद्र आणि ८५ जलकुंभाद्वारे तसेच ८५ जलकुंभाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पाण्याची तूट ३५ ते ४० टक्के असून, तो चिंतेचा विषय आहे. धरण ते पाइपलाइन दरम्यानच सध्या १० ते १२ टक्के गळती होत असते. उर्वरित पाण्याची तूट ही व्हॉल्वमधील गळती, तोटी नसणे अशा अनेक बाबींमुळे होते.
त्या पार्श्वभूमीवर सर्व नळांना तोट्या बसवण्यात याव्या, थोडे प्रबोधन करावे, तसेच फेडरल जोडणी ते ग्राहकाचे पाणी मीटर यातील पाईप जोड याचा विचार करून बचत केली जाऊ शकते. तसेच स्मार्ट सिटीसाठी ओला आणि सुका कचरा विलग करण्याचाही विचार करावा, असे निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)