कळवणकरांसाठी वाढीव पाणी आरक्षण मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:10 IST2021-07-09T04:10:51+5:302021-07-09T04:10:51+5:30

शिवाजीनगर, गणेशनगर, संभाजीनगर, रामनगर, गांधी चौक, फुलाबाई चौक, नेहरू चौक, मेन रोड, सावरकर चौक, मोहल्ला, ओतूर रोड आदी नगरपंचायतच्या ...

Approved increased water reservation for informants | कळवणकरांसाठी वाढीव पाणी आरक्षण मंजूर

कळवणकरांसाठी वाढीव पाणी आरक्षण मंजूर

शिवाजीनगर, गणेशनगर, संभाजीनगर, रामनगर, गांधी चौक, फुलाबाई चौक, नेहरू चौक, मेन रोड, सावरकर चौक, मोहल्ला, ओतूर रोड आदी नगरपंचायतच्या १७ प्रभागात कळवण शहर विस्तारले आहे. ग्रामपंचायत असताना असलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून कळवण शहरातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याची सोडवणूक नगरपंचायतच्या माध्यमातून सद्यस्थितीत केली जाते. सध्या कळवण नगरपंचायतच्या पाणी पुरवठ्यासाठी जलसंपदा विभागाकडून चणकापूर धरणातून ०.८६ दशलक्ष घनमीटर पाणी मंजूर आहे. कळवण शहराला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या योजना ह्या गिरणा नदीपात्रात असून योजनाचे उद्भव (विहिरी) उन्हाळ्यात कोरडे ठाक पडतात. तेव्हा इतर खासगी विहीर मालकाकडून पाणी घेऊन कळवण शहरातील पाणी प्रश्नाची सोडवणूक नगरपंचायत प्रशासनाला काही वेळा करावी लागते.

अर्जुन (नकट्या) बंधाऱ्याचे विघ्न मिटविण्यात तत्कालीन आमदार स्व. ए. टी. पवार, तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य, आमदार नितीन पवार, तत्कालीन पंचायत समिती सभापती गटनेते कौतिक पगार यांना यश आले. चणकापूरचे पाण्याचे आवर्तन मालेगावकरांसाठी सोडल्याने गिरणा नदीपात्रातील नकट्या (अर्जुन ) बंधारा पाण्याने ओसंडून वहात असतो. त्यामुळे कळवण नगरपंचायतच्या पाणी पुरवठा योजनांना दिलासा मिळतो. त्यामुळे पाणी टंचाई जाणवत नाही. मात्र पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता भविष्यात पाणी प्रश्न बिकट होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील इतर शहरी व ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या असून २ ते ३ दिवसानंतर पिण्याचे पाणी उपलब्ध होते. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय दिलासादायक मानला जात आहे.

इन्फो

जलसंपदाकडून दखल

कळवण शहराची वाढत्या लोकसंख्येचा विचार करून सध्या अस्तित्वात असलेली पाणी पुरवठा योजना खूपच अपुरी पडणार असल्याने चणकापूर धरणातून कळवण शहराला वाढीव पाणी आरक्षण मंजूर करण्याचा प्रस्ताव आमदार नितीन पवार, नगरपंचायतचे गटनेते कौतिक पगार यांनी जलसंपदा विभागाकडे सादर केला होता. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी खास बाब म्हणून प्रस्तावाला मंजुरी दिल्याने कळवण नगरपंचायतीच्या पाणीपुरवठ्यासाठी जलसंपदा विभागाकडून १.३९ दशलक्ष घनमीटर पाणी मंजूर झाले आहे.

कोट...

सन २०५१ ची लोकसंख्या गृहीत धरून या पाण्याचे चणकापूर धरणात आरक्षण देण्यात आले आहे. सध्या कळवणकरांना पिण्याच्या पाण्यासाठी ०.८६ दशलक्ष घनमीटर पाणी चणकापूर धरणामधून मंजूर करण्यात आले आहे. पूर्वीची आणि आजची मंजुरी लक्षात घेता, चणकापूरमधून कळवण नगरपंचायतीसाठी आता २.२५ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होणार आहे.

- नितीन पवार, आमदार

Web Title: Approved increased water reservation for informants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.