आरोग्याच्या ‘त्या’ कामांची थांबविली मंजुरी

By Admin | Updated: August 8, 2014 00:57 IST2014-08-05T22:29:11+5:302014-08-08T00:57:30+5:30

आरोग्याच्या ‘त्या’ कामांची थांबविली मंजुरी

Approval of 'those' activities of health | आरोग्याच्या ‘त्या’ कामांची थांबविली मंजुरी

आरोग्याच्या ‘त्या’ कामांची थांबविली मंजुरी

 

नाशिक : आरोग्य समिती आणि सभापती यांना अंधारात ठेवून मंजूर केलेल्या पावणेदोन कोटी रुपयांच्या कामाची प्रशासकीय मंजुरी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी थांबविली असून, आरोग्य समितीत चर्चा होऊन नंतरच त्या मंजूर कराव्यात, असे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत.
दरम्यान, परस्पर कामे मंजूर करून सभापती व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबाबत बोलणाऱ्या संबंधित आरोग्य विभागातील लिपिक चंद्रकांत वैष्णव याला निलंबित करण्याबाबतची कार्यवाही प्रशासनाने सुरू केल्याचे कळते. तसेच याच प्रकरणी शिक्षण सभापतींवर या लिपिकाने टक्केवारीचे आरोप केल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात असून, सभापती ज्योती माळी यांनी त्याचा इन्कार केला आहे. गुपचूप मंजुरी देण्याचे कारणच संबंधित लिपिकाने ठेकेदारांकडून टक्केवारी खाल्ल्याचे उघड होते, असा टोला लगावला आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची दुरुस्ती तसेच आरोग्य केंद्रांभोवती संरक्षक भिंत बांधण्याच्या सुमारे पावणेदोेन कोटी रुपयांच्या २४ कामांना परस्पर मंजुरी देऊन सभापतींना व आरोग्य समितीला अंधारात ठेवल्याचा आरोप सभापती ज्योती बाळासाहेब माळी यांनी केला होता. तसेच आरोग्य विभागातील संबंधित लिपिकावर कारवाई करण्याची मागणीही केली होती. याच मागणीसाठी ज्योती माळी व बाळासाहेब माळी हे सुखदेव बनकर यांना मंगळवारी दुपारी भेटले. त्यावेळी बनकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, लिपिक चंद्रकांत वैष्णव, सभापतींचे स्वीय सहायक रवींद्र थेटे यांना बोलावून घेत प्रकरणाची माहिती घेतली. तसेच ही कामे समितीला व सभापतींना विश्वासात न घेताच मंजूर का केली, याचा जाब वैष्णव व डॉ. वाकचौरे यांना विचारला. तसेच प्रशासनाला वैष्णव याच्यावर निलंबनाची कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव ठेवण्याचे आदेश दिले. तसेच मंजूर केलेली कामे थांबवून ती आरोग्य समितीच्या बैठकीत चर्चा करूनच मंजूर अथवा नामंजूर करावी, असे सभापतींना सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Approval of 'those' activities of health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.