महिला बालकल्याण सदस्यांची नियुक्ती
By Admin | Updated: August 17, 2016 00:15 IST2016-08-17T00:14:02+5:302016-08-17T00:15:01+5:30
महापालिका : सभापतिपदावर राष्ट्रवादीचा दावा

महिला बालकल्याण सदस्यांची नियुक्ती
नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर नऊ सदस्यांच्या नियुक्तीची घोषणा महापौरांनी मंगळवारी महासभेत केली. दरम्यान, नियुक्त सदस्यांना अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधी प्राप्त होणार असून औटघटकेच्या सभापतिपदावर राष्ट्रवादीने दावा केला आहे.
महिला व बालकल्याण समितीवर दरवर्षी नऊ सदस्यांची नियुक्ती केली जाते. विद्यमान समितीची मुदत १२ आॅगस्टला संपुष्टात आल्यानंतर नव्याने नऊ सदस्यांची पक्षीय तौलनिक संख्याबळानुसार नियुक्ती करण्यात आली. महापौर अशोक मुर्तडक यांनी महासभेत मनसेच्या अर्चना जाधव, रेखा बेंडकुळे व कांचन पाटील, शिवसेनेच्या शोभा निकम व ललिता भालेराव, राष्ट्रवादीच्या उषा अहेर व सुनीता शिंदे, भाजपाच्या ज्योती गांगुर्डे आणि कॉँग्रेसच्या वत्सला खैरे यांची नियुक्ती जाहीर केली. नियुक्त सदस्यांचा यावेळी महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भाजपाने ज्योती गांगुर्डे व कॉँग्रेसच्या वत्सला खैरे यांना पुन्हा एकदा संधी दिली.
सेनेच्या कोट्यातून रिपाइंच्या ललिता भालेराव यांची दुसऱ्यांदा वर्णी लागली. पुढील वर्षी मार्च २०१७ मध्ये महापालिकेची निवडणूक होत असून सदर समितीला अवघा सहा महिन्यांचा कार्यकाळ लाभणार आहे. त्यातच डिसेंबरमध्ये पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार असल्याने त्याची आचारसंहिता आॅक्टोबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे, तर महापालिका निवडणुकीची आचारसंहिता डिसेंबर अखेर किंवा जानेवारीत लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे समितीला फार तर दीड ते दोन महिनेच कामकाजासाठी मिळणार आहेत. आता या समितीच्या औटघटकेच्या सभापतीपदासाठी राष्ट्रवादी कॉँग्रसने दावा सांगितला असून उषा अहेर यांचे नाव सभापतीपदासाठी घेतले जात आहे.