पोलीसपाटीलपदी उच्चशिक्षितांची नियुक्ती

By Admin | Updated: May 18, 2016 23:33 IST2016-05-18T23:22:53+5:302016-05-18T23:33:29+5:30

दिंडोरी-पेठ : गुणवत्तेनुसार निवडप्रक्रियेमुळे ग्रामस्थांचा लाभ

Appointment of higher education for the police force | पोलीसपाटीलपदी उच्चशिक्षितांची नियुक्ती

पोलीसपाटीलपदी उच्चशिक्षितांची नियुक्ती

दिंडोरी : पोलीसपाटील हे गावच्या दृष्टीने मानाचे पद. शासनाने प्रथमच आरक्षणानुसार व गुणवत्तेवर आधारित पोलीसपाटील व कोतवाल पदाची भरतीप्रक्रिया राबविल्याने तरुण व पदव्युत्तर, पदवीधारक अशा विविध घटकांना गावचा पोलीसपाटील होण्याची संधी प्राप्त झाली आहे. दिंडोरी व पेठ तालुक्यातील पोलीसपाटील व कोतवाल पदाच्या जागेसाठी अंतिम पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून, पात्र उमेदवार व प्रतीक्षा यादी दिंडोरी उपविभागीय कार्यालयात लावण्यात आल्याची माहिती पोलीसपाटील व कोतवाल भरतीप्रक्रिया समितीचे अध्यक्ष तथा प्रांताधिकारी मुकेश भोगे यांनी दिली.
लेखी व तोंडी परीक्षा राबविण्यासाठी भरतीप्रक्रि या समितीचे अध्यक्ष तथा प्रांताधिकारी मुकेश भोगे, दिंडोरीचे तहसीलदार मंदार कुलकर्णी, पेठचे तहसीलदार कैलास कडलग, गटविकास अधिकारी राहुल रोकडे, पोलीस निरीक्षक मधुकर गावित, समाजकल्याण विभागाचे प्रतिनिधी खांडगे, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी शरद वाणी, भूमिअभिलेख तालुका अधीक्षक धोंगडे आदिंनी मुलाखती घेतल्या. यात दिंडोरी तालुक्यातील पोलीसपाटील पदासाठी पात्र उमेदवारांपैकी सात पदव्युत्तर, १७ पदवीधर, दोन डी.एड., २८ बारावी पास व १८ दहावी पास उमेदवार असून, त्यात २१ महिला पोलीसपाटील पदास पात्र आहेत. पेठ तालुक्यात सात पदव्युत्तर, २४ पदवीधर, पाच डी.एड., अकरावी-बारावी पास व पाचवी-सातवी पास उमेदवार असून, त्यात बारा महिला पोलीसपाटील पदास पात्र आहेत. दोन्ही तालुक्यातील पोलीसपाटील व कोतवाल पदाच्या भरतीसाठी लेखी परीक्षा व तोंडी परीक्षा अतिशय पारदर्शकपणे राबविण्यात आली. पोलीसपाटील पदाच्या दिंडोरी तालुक्यातील ७३ गावांसाठी व पेठ तालुक्यातील ५२ गावांसाठी भरतीप्रक्रि या राबविण्यात आली. त्यात लेखी परीक्षेचे ८० पैकी गुण व तोंडी परीक्षेचे २० पैकी गुण, मिळालेल्या गुणांची बेरीज करून गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. लेखी परीक्षा ८० गुणांची वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची होती. त्यात पोलीसपाटील पदासाठी लेखी परीक्षेस ८० पैकी ३६ गुण मिळाले तरच तो उमेदवार तोंडी परीक्षेस पात्र होतो. तोंडी परीक्षा २० गुणांची घेण्यात आली. लेखी परीक्षेस पात्र असणाऱ्या उमेदवारांना तोंडी परीक्षेस उपस्थित राहणे अनिवार्य होते. त्यानुसार लेखी परीक्षेचे गुण व त्यात तोंडी परीक्षेचे गुण मिळून गुणवत्ता यादी बनविण्यात आली. तोंडी परीक्षेचे गुणदान करताना इयत्ता दहावी पास, बारावी पास, डी.एड.धारक, पदवीधर, पदव्युत्तर, संगणक प्रमाणपत्र, खेळाचे प्रमाणपत्र यानुसार पारदर्शकपणे गुणदान करून फक्त तोंडी प्रश्नाच्या अचूक उत्तराला दोन गुण समितीने दिले. याप्रमाणे निवड समितीने पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली. कोतवाल पदासाठी दिंडोरी तालुक्यातून ११ पात्र उमेदवार व पेठ तालुक्यातील ९ पात्र उमेदवार असून, हे ९ उमेदवार पदव्युत्तर व पदवीधर आहेत. पोलीसपाटील व कोतवाल पदासाठी पात्र उमेदवारांना चारित्र्य पडताळणी व ग्रामीण रुग्णालयाचा वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर व पात्र उमेदवाराबद्दल तक्र ार प्राप्त असल्यास त्यांच्याबाबत चौकशीअंती नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. पात्र उमेदवार जर तपासाअंती अपात्र ठरला तर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात येईल व पात्र उमेदवार यांच्याबद्दल काही तक्रार असल्यास लेखी स्वरूपात प्रांत अधिकारी कार्यालयात स्वीकारल्या जातील, अशी माहिती प्रांत अधिकारी मुकेश भोगे यांनी दिली.

Web Title: Appointment of higher education for the police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.