पाच समित्यांवर होणार का ‘तज्ज्ञ’ संचालकांची नियुक्ती

By Admin | Updated: June 9, 2015 01:44 IST2015-06-09T01:44:09+5:302015-06-09T01:44:52+5:30

कार्यकारी,लेखापरीक्षण समितीचा समावेश

Appointment of 'expert' directors to be held on five committees | पाच समित्यांवर होणार का ‘तज्ज्ञ’ संचालकांची नियुक्ती

पाच समित्यांवर होणार का ‘तज्ज्ञ’ संचालकांची नियुक्ती

  नाशिक : जिल्हा बॅँकेवर निवडून आलेल्या २१ संचालकांमध्ये कोणत्या ना कोणत्या तरी क्षेत्रात ‘नैपुण्य’ दाखविण्याची संधी असल्याची चर्चा असून, पाच वर्षांसाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्तीसह विविध समित्यांवर वर्णी लावण्यासाठी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांची कसोटी लागणार आहे. अध्यक्षपदी निवड होताच नरेंद्र दराडे यांनी आपण अमुक एका पक्षाचा अध्यक्ष असल्याचे सांगतानाच काही तासांतच आपण दोन्ही गटांचे अध्यक्ष असल्याचा दावा केला होता. त्यामुळेच त्यांच्या दाव्यात कितपत तथ्य आहे, याची कसोटी पाहणारा काळ लवकरच येऊ घातला आहे. जिल्हा बॅँकेचे कामकाज करताना त्यासाठी तयार करण्यात आलेल्या विविध समित्यांवर निवडून आलेल्या संचालकांची नियुक्ती करण्यासाठी लवकरच एका बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. येत्या १३ जून रोजी होणाऱ्या संचालकांच्या बैठकीत या समित्या नियुक्त करण्यासाठीचे सर्वाधिकार अध्यक्ष नरेंद्र दराडे यांना देण्याचा ठराव संमत होणार असल्याचे समजते. हा ठराव संमत झाल्यानंतर दराडे यांना सर्व कामकाज पाहण्याचे अधिकार मिळणार आहेतच; शिवाय त्यांना त्यासाठीचे स्वाक्षरीचेही अधिकार बहाल करण्यात येतील. त्यांच्या अनुपस्थितीत हे अधिकार उपाध्यक्ष सुहास कांदे यांना असतील. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत कामकाज करताना प्रामुख्याने पाच समित्यांची स्थापना करण्यात येते. त्यात सेवक समिती, कार्यकारी संचालकांची समिती, कर्ज वसुली समिती, अकृषक समिती व लेखापरीक्षण समिती या समित्यांचा त्यात समावेश असतो. त्यातही लेखापरीक्षण समितीच्या पदसिद्ध अध्यक्षपदी बॅँकेचे उपाध्यक्ष असतात, तर इतर चारही समित्यांच्या अध्यक्षपदी जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष असतात. त्यामुळे या चार समित्यांमध्ये कोणत्या ‘तज्ज्ञ’ संचालकांचा समावेश करावा, यासाठी नरेंद्र दराडे यांना बरीच कसरत करावी लागण्याची चिन्हे आहेत. येत्या १३ तारखेच्या बॅँक संचालकांच्या बैठकीत याबाबतचे बरेचसे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Appointment of 'expert' directors to be held on five committees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.