शनैश्चर पतसंस्थेवर प्रशासकाची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2016 22:17 IST2016-01-11T22:16:08+5:302016-01-11T22:17:50+5:30
बारा सदस्यांनी राजीनामे दिल्याने सहायक निबंधकांचा निर्णय

शनैश्चर पतसंस्थेवर प्रशासकाची नियुक्ती
घोटी : इगतपुरी तालुक्यात उत्पन्न व सहकार क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या घोटी येथील शनैश्चर पतसंस्थेत आर्थिक गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधक आदि बारा संचालकांनी चेअरमन व व्यवस्थापक यांच्यावर अविश्वास व्यक्त करून इगतपुरीच्या सहायक निबंधकांकडे सामूहिक राजीनामे दिल्याने अखेर या पतसंस्थेवर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेत आर. आर. मोरे यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे. दरम्यान, या बारा संचालकांनी सामूहिक राजीनामे दिल्याने या बाबीची सुनावणी होऊन सहायक निबंधकांनी संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमणुकीचे आदेश दिले आहेत.
घोटी शहरातील शनैश्चर ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या कारभारात दोन महिन्यांपासून विस्कळीतपणा आल्याने व आर्थिक व्यवहारात संशय निर्माण झाल्याने काही मोठ्या ठेवीदारांनी आपल्या ठेवी तत्काळ काढून घेतल्याने संस्थेचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे ठेवीदारांनी ठेवी काढून घेण्याचे सत्र अवलंबिले होते. त्यात मागील आठवड्यात धडक कर्जवसुली मोहीम राबवूनही त्याचा फारसा परिणाम झाला नव्हता.
दरम्यान, संस्थेच्या बारा संचालकांनी ३० नोव्हेंबर २०१५ रोजी सामूहिक राजीनामे दिले होते. त्यात ७ जानेवारी २०१६ रोजी सुनावणी होऊन त्यात संचालक मंडळाचे राजीनामे मंजूर करून पुढील कामकाजाकरिता पतसंस्थेवर प्रशासकाची नेमणूक करण्याची मागणी संचालकानी केली होती. यावरून संस्थेचे स्थगित असल्याचे निदर्शनास आल्याने संस्थेचे कामकाज आणि व्यवहार सुरळीत चालू होण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमानुसार या पतसंस्थेवर आर.आर. मोरे यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आल्याचे आदेश सहायक निबंधक ए. व्ही. देशपांडे यांनी दिले.
संस्थेवर प्रशासक नेमल्याने आता थकीत कर्जाची वसुली मोठ्या प्रमाणात व्हावी व ठेवीदारांच्या देय असलेल्या ठेवी परत कराव्यात, अशी अपेक्षा सभासद व ठेवीदार करीत आहेत. (वार्ताहर)