सिन्नर तालुक्यात एक अर्ज अवैध
By Admin | Updated: February 8, 2017 00:33 IST2017-02-08T00:32:43+5:302017-02-08T00:33:22+5:30
सिन्नर तालुक्यात एक अर्ज अवैध

सिन्नर तालुक्यात एक अर्ज अवैध
सिन्नर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची मंगळवारी तहसील कार्यालयात छाननी करण्यात आली. त्यात जिल्हा परिषदेसाठी दाखल झालेले सर्व अर्ज वैध ठरले, तर पंचायत समितीसाठी भरतपूर गणातील एक अर्ज अवैध ठरला. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. जिल्हा परिषदेच्या सहा गटांसाठी ५४, तर पंचायत समितीच्या बारा गणांसाठी १११ अर्ज दाखल झाले होते. मंगळवारी सकाळी ११ वाजता निवडणूक अधिकारी विठ्ठल सोनवणे, तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांनी उमेदवारी अर्जांची छाननी सुरू केली. सर्वप्रथम जिल्हा परिषदेच्या सहा गटांची छाननी करण्यात आली. त्यात पक्षाचा प्रमुख एबी फॉर्म असलेल्या उमेदवारास पक्षाचा अधिकृत उमेदवार ठरविण्यात आले, तर पर्यायी उमेदवारास अपक्ष म्हणून ग्राह्य धरण्यात आले. जिल्हा परिषदेचे सर्व ५४ अर्ज वैध ठरले. त्यानंतर पंचायत समितीची गणनिहाय छाननी सुरू करण्यात आली. भरतपूर गण ओबीसी महिलेसाठी राखीव असून, या गणातून मिरगाव येथील स्नेहल अभिमन शेळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांचे वय २१ वर्षे पूर्ण नसल्याने त्यांना उमेदवार म्हणून ग्राह्य धरता येणार नसल्याचे सांगत त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला. नायगाव या ओबीसी गणातील उमेदवार बबन भाऊसाहेब लोहकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल असलेल्या गुन्ह्यासंदर्भात वैध किंवा अवैध ठरवावा यासंदर्भात निकाल राखून ठेवण्यात आला होता. मात्र लोहकरे यांनी मुदतीत कागदपत्रे सादर केल्याने त्यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला. छाननीसाठी राजकीय पक्षांचे पदाधिकारी व उमेदवार उपस्थित होते. (वार्ताहर)