इच्छुकांचे आधी केडर नंतर अर्ज
By Admin | Updated: January 31, 2017 00:49 IST2017-01-31T00:49:26+5:302017-01-31T00:49:41+5:30
पुरोगामी आघाडी : २ तारखेला सर्व उमेदवार भरणार अर्ज

इच्छुकांचे आधी केडर नंतर अर्ज
नाशिक : बड्या राजकीय पक्षांमध्ये अद्यापही उमेदवारीची स्पष्टता नसल्याने पक्षनेत्यांची कसोटी लागली आहे. सर्वच ठिकाणी प्रबळ दावेदारी करण्यात आल्यामुळे राजकीय पक्षांच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. असे चित्र एकीकडे असताना दहा पक्षांच्या पुरोगामी लोकशाही आघाडीने केडरबेस तयारी चालविली आहे. इच्छुक उमेदवारांची १ फेब्रुवारीला कार्यशाळा घेण्यात येणार असून, २ तारखेला २१ प्रभागांमध्ये उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. सेना, भाजपा, मनसे, राष्ट्रवादी आणि कॉँग्रेस या पाच प्रमुख पक्षांच्या विरोधात पुरोगामी लोकशाही आघाडी स्थापन करण्यात झाली आहे. एआयएमआयएम, बीआरएसपी, रिपाइं सेक्युलर, संभाजी ब्रिगेड, आवामी विकास पार्टी, एपीआय, बीएमपी, छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेड, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, बहुजन भीमसेना या पक्षांची आघाडी निवडणुकीची तयारी करीत आहे. उमेदवारांच्या मुलाखती झाल्या असून, एक तारखेला उमेवारांच्या नावांची घोषणा होणार आहे. ज्या ठिकाणी एकापेक्षा अधिक इच्छुक आहेत त्या ठिकाणी समन्वयाने तोडगा काढण्यात येऊन नंतर नावे जाहीर केली जाणार आहेत. या सर्व उमेदवारांना अगोदर प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती पुरोगामी आघाडीचे समन्वयक डॉ. संजय अपरांती यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)
कार्यशाळा घेतली जाणार
उमेदवारी अर्ज कसा भरावा, मतदारांपुढे जाताना प्रचाराचे कोणते मुद्दे असले पाहिजे. नाशिक शहराची सध्याची परिस्थिती आणि होऊ शकणारी कामे आदि अनेक बाबींवर उमेदवारांची संपूर्ण दिवस कार्यशाळा घेतली जाणार आहे. आघाडीचे उमेदवार आपापल्या पक्ष निशाणीवर निवडणूक लढविणार असले तरी आघाडीचा स्वतंत्र जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यावरच निवडणूक लढविली जाणार आहे. याचे संपूर्ण प्रशिक्षण उमेदवारांना देण्यात येणार आहे. २ फेब्रुवारीला सर्व उमेदवार आपापल्या विभागीय कार्यालयांमध्ये अर्ज दाखल करणार आहेत.