The appeal continues for weeks | आवाहन झुगारुन आठवडे बाजार सुरूच

आवाहन झुगारुन आठवडे बाजार सुरूच

ठळक मुद्देउमराणे ग्रामपंचायत प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांचा ठेंगा


उमराणे : कोरोनाच्या वाढत्या महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी येथील ग्रामपंचायत प्रशासनातर्फे शनिवारी भरणारा आठवडे बाजार बंद राहणार असल्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र या आवाहनाला विक्रेत्यांसह नागरिकानी ठेंगा दाखवला असून शनिवारचा (दि.६) बाजार भरला होता. यावेळी नेहमीसारखी नागरिकांची गर्दी झाली होती. शिवाय नागरिकांमध्ये कोरोनाविषयी कुठलीही भीती नसल्याचे चित्र दिसून आले.
परिसरातील बहुतांशी गावांचे केंद्रबिंदू असलेल्या उमराणे येथे दर शनिवारी आठवडे बाजार भरतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची विशेषत: महिलांची गर्दी होत असते. होत असलेली गर्दी बघता कोराना टाळण्यासाठी मास्क, दोन व्यक्तींमधील सुरक्षित अंतर, सॅनेटायझर आदी बाबींचा वापर होत नसल्याचे चित्र दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात दररोज कोरोनाग्रस्तांच्या संख्येत होत असलेली वाढ बघता कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने शनिवारी भरणारा आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. मात्र सकाळपासूनच विक्रेत्यांसह खरेदीदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.
त्यानंतर बाजार करण्यासाठी महिलांची गर्दी बघता ग्रामपंचायत प्रशासनाने केलेल्या आठवडे बाजार बंदच्या आवाहनाला एका प्रकारे ठेंगाच दाखवला असून विक्रेत्यांसह खरेदीदारांना विनामास्क व सुरक्षित अंतराचा जणू विसरच पडल्याचे चित्र दिसून आले.

दरम्यान ग्रामपंचायत प्रशासनाने केलेल्या आठवडे बाजार बंदची माहीती लवकर मिळाली नसल्याने परिसरातील माल विक्रेते बाजारात आले होते. मात्र आठवडे बाजार बंद न करता सर्व नागरिकांनी मास्क वापरणे, दोन व्यक्तींमधील सुरक्षित अंतर ठेवणे व कोरोनाचे नियम सक्तीचे करून आठवडे बाजार सुरूच ठेवण्याची मागणी व्यापारी संघटनेने ग्रामपंचायत प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
(०६ उमराणे)

उमराणे आठवडे बाजारात विनामास्क विक्रेत्यांसह खरेदीदाराची झालेली गर्दी.

Web Title: The appeal continues for weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.