कुणाची ‘लॉटरी’ लागणार?
By Admin | Updated: February 14, 2017 01:41 IST2017-02-14T01:41:25+5:302017-02-14T01:41:39+5:30
सेनेची कसोटी : राष्ट्रवादी - भाजपात चुरस

कुणाची ‘लॉटरी’ लागणार?
संदीप झिरवाळ : पंचवटी
सर्वाधिक झोपडपट्ट्यांचा भाग असलेल्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये यंदा राष्ट्रवादी कॉँग्रेस व भाजपा या दोनच प्रमुख पक्षात समोरासमोर लढत होणार असली तरी जे कुणी निवडून येतील, त्यांची लॉटरीच लागणार आहे. सुरुवातीला शिवसेनेने या प्रभागात चांगलाच दबदबा निर्माण केला होता, मात्र एबी फॉर्म वाटपाच्या गोंधळात चक्क कोरे एबी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले गेल्याने संपूर्ण शिवसेनेचेच पॅनल बाद झाले. त्यामुळे सेनेला ऐनवेळी पुरस्कृत उमेदवार उभे करावे लागले. त्यातही गटबाजी झाल्याने पुरस्कृत उमेदवारांनीही बंड पुकारून स्वतंत्र पॅनल तयार केल्याने काही गटातील लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे. पूर्वीचा ३, ९ व १० असे तीन प्रभाग मिळून नवीन प्रभाग ४ ची रचना करण्यात आली आहे. विद्यमान नगरसेवकासह दोन माजी नगरसेवक, नगरसेवक मातोश्री, पत्नी, पती असे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. झोपडपट्टीतील एकगठ्ठा मतदान कोणाच्या पथ्यावर पडते, यावर विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे. अनुसूचित जाती महिला ‘अ’ गटासाठी प्रभागातून पाच उमेदवार आहेत. सलग दोन पंचवार्षिक निवडून आलेल्या प्रा. कविता कर्डक पुन्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. शिवसेनेने पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केलेल्या नगरसेवक विशाल घोलप यांच्या मातोश्री प्रतिभा घोलप यादेखील निवडणूक रिंगणात आहेत. युवकांची मोठी फौज असलेल्या शंकर हिरे यांच्या मातोश्री शांता हिरे या भाजपाकडून निवडणूक रिंगणात आहेत. भाजपाच्या बंडखोर माजी नगरसेवक रुख्मिणी कर्डक यांना मनसेने पुरस्कृत केले आहे. तर शिवसेनेशी बंडखोरी केलेल्या महिला आघाडीच्या लक्ष्मी ताठे यांनीही निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. महिलांच्या अनुसूचित जमाती ‘ब’ गटासाठी सर्वच उमेदवार नवखे असून, यात भाजपाकडून प्रा. सरिता सोनवणे, राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून राजश्री जाधव, मनसेच्या मंदा ओढाणे, बसपाकडून दुर्गा जाधव या निवडणूक रिंगणात आहेत. तर माजी नगरसेवक गोटीराम वरघडे यांच्या पत्नी जिजाबाई वरघडे या अपक्ष आहेत. शिवसेनेच्या पुरस्कृत वर्षा पगारे या उमेदवारी करीत आहे.
नागरिकांचा मागासवर्ग ‘क’ गटातून सेनेच्या पुरस्कृत परंतु ऐनवेळी स्वतंत्र गट तयार करणाऱ्या सविता बडवे, भाजपाकडून जगदीश पाटील, शिवसेना पुरस्कृत भगवान भोगे, राष्ट्रवादीकडून राजेश माने तर मनसेचे भास्कर लोणारे हे निवडणूक रिंगणात आहेत. ‘क’ गटात जो-तो उमेदवार त्या-त्या भागात मातब्बर असल्याने लढत रंगतदार होईल. तर सर्वसाधारण ‘ड’ गटात जवळपास १० उमेदवार रिंगणात असून यात भाजपा, राष्ट्रवादी कॉँग्रेस, बसपा या पक्षांत लढत होण्याची शक्यता आहे. विद्यमान नगरसेवक रूपाली गावंड यांचे पती हेमंत शेट्टी हे भाजपाकडून निवडणूक लढवित आहेत. तर राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून सागर लामखेडे हे रिंगणात
आहेत. बसपाकडून मुकुंद गांगुर्डे तर मनसेचे अमर बोरसे, धर्मराज्य
पक्षाचे योगेश कापसे यांच्यासह पाच अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सर्वसाधारण जागेसाठी मुख्य लढत भाजपा, राष्ट्रवादीत होणार आहे.