ढगाळ वातावरणामुळे चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:12 IST2021-01-09T04:12:19+5:302021-01-09T04:12:19+5:30
खंडित वीजपुरवठ्यामुळे नाराजी नाशिक : शहरातील काही भागात विजेचा लपंडाव सुरू असल्याने, नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. सतत ...

ढगाळ वातावरणामुळे चिंता
खंडित वीजपुरवठ्यामुळे नाराजी
नाशिक : शहरातील काही भागात विजेचा लपंडाव सुरू असल्याने, नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांच्या किमती इलेक्ट्रिकल वस्तुंचे नुकसान होत असल्याने, नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागातो. वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन
नाशिक : शहरालगतच्या ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरू असल्याने, गावागावांत प्रचाराचा धुरळा उडाला आहे. यामुळे कोरोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. प्रचाराच्या वेळी कार्यकर्त्यांनी तोंडाला मास्क लावून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
रब्बीच्या क्षेत्रात वाढ
नाशिक : या वर्षी पाऊस चांगला झाल्याने रब्बीच्या पेरणी क्षेत्रात बऱ्यापैकी वाढ झाली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी असल्याने, बागायती पिकांची लागवड करण्यात आली आहे. या वर्षी गव्हाच्या क्षेत्रात थोड्या-फार प्रमाणात वाढ झाली आहे.
फुलबाजारातील गर्दीने चिंता
नाशिक : पंचवटीतील गणेशवाडी भागात भरणाऱ्या फुलबाजारात शेतकरी आणि ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने, परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक शेतकरी मास्क लावत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
कमी दाबाने पाणीपुरवठा
नाशिक : शहरातील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची नागरीकांची तक्रार आहे. महापालिकेने पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने, नाकरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.