पक्षविरोधी कारवाया; भाजपा नेत्यांवर कारवाई
By Admin | Updated: February 25, 2017 01:08 IST2017-02-25T01:08:04+5:302017-02-25T01:08:20+5:30
गिरीश महाजन : नवनिर्वाचितांच्या सत्कार सोहळ्यात इशारा

पक्षविरोधी कारवाया; भाजपा नेत्यांवर कारवाई
नाशिक : महापालिका निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशापेक्षा अधिक भव्य यश म्हणजे ८० हून अधिक जागा मिळणे अपेक्षित होते. परंतु पक्षातच उणिवा राहिल्या. पक्षाच्या चारही उमेदवारांसाठी चार मते मागण्याऐवजी एकच मत मागण्यात आले. तसेच काही पदाधिकाऱ्यांनीच पक्षविरोधी काम केले. त्यांच्या चुका लक्षात आल्या असून, पुरावेही मिळाले आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन भाजपाचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. इतकेच नव्हे तर असे नेते आणि पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही महाजन यांनी दिले आहेत.निवडणुकीच्या भाजपाला १२२ पैकी ६६ जागा मिळाल्याने स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी त्यातही पक्षांतर्गत कंगोरे आहे. राजी-नाराजीतून झालेल्या बंडखोऱ्या आणि पक्षविरोधी कारवाया यांना आता तोंड फुटू लागले आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनीच जाहीर कार्यक्रमात हा विषय मांडला आहे. वसंत स्मृती येथे भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार शुक्रवारी करण्यात आला. यावेळी महाजन बोलत होते. व्यासपीठावर पर्यटनमंत्री जयकुमार रावल, संघटनमंत्री किशोर काळकर, पक्षाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. अपूर्व हिरे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पक्षांतर्गत विरोधकांचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे
निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने अनेक जण नाराज झाले. पक्षाच्या आवाहनाला प्रतिसाद ज्यांनी माघार घेतली त्या कार्यकर्त्यांचा निश्चितपणे सन्मान केला जाईल, असे सांगताना पक्षाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी निवडणुकीत पक्षाच्याच लोकांनी आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. तसेच भाजपाच्या उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी करायला भाग पाडले, असा आरोप करीत याबाबतचा सविस्तर अहवाल आपण मुख्यमंत्र्यांकडे सादर केल्याचे सांगून शहराध्यक्ष सानप यांनी धक्का दिला. मागील पंचवार्षिक निवडणुकीत पक्षाच्या गटनेत्याचे न ऐकणाऱ्यांचा हिशेब चुकता केला आहे, असे जाहीररीत्या सांगणाऱ्या सानप यांनी पक्षामुळे आपण निवडून आलो आहोत, त्यामुळे पक्षादेशानुसार काम करा, कोणाच्या हातचे बाहुले बनू नका, असा सल्लाही दिला.
गेल्या पंचवीस वर्षात प्रथमच एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत अनेकांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी उपलब्ध जागा पाहता सर्वांना संधी देणे शक्य नव्हते. मात्र, निवडून येण्याच्या क्षमतेच्या निकषावर उमेदवारी देण्यात आल्या होत्या. त्यापेक्षा अधिक जागा मिळाल्या असत्या, परंतु पक्षातील काहींच्या चुका पक्षाच्या पराभवाला कारणीभूत ठरल्या. या सर्व गोष्टींचे विश्लेषण यथावकाश केले जाईल, असेही ते म्हणाले. निवडणुकीत यश मिळाले म्हणजे काम झाले असे नाही, तर लोकांच्या सुख-दु:खात सहभागी व्हावे, या कामगिरीवरच विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत मतदार मूल्यांकन करतील, असेही ते म्हणाले. यावेळी रावल यांनी मनपाबरोबरच ग्रामीण भागात म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्याचे सांगितले. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, सुनील बागुल, चिटणीस लक्ष्मण सावजी, जिल्हाध्यक्ष दादा जाधव उपस्थित होते. सूत्रसंचालन नाना शिलेदार यांनी केले.