जेलरोडला अतिक्रमण विरोधी मोहीम
By Admin | Updated: January 5, 2016 00:43 IST2016-01-05T00:38:15+5:302016-01-05T00:43:58+5:30
पालिकेची कारवाई : अनधिकृत ओटे; पत्र्याचे शेड केले उद्ध्वस्त

जेलरोडला अतिक्रमण विरोधी मोहीम
नाशिकरोड : मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने व्यावसायिक संकुलातील अनधिकृत ओटे, पत्र्याचे शेड, जगताप मळा येथील शेड व जेलरोड पंचक येथील अनधिकृत तारेचे कुंपण जमीनदोस्त केले. यामुळे अनधिकृत अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे.
मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी दुपारी रेजिमेंटल प्लाझामागील गायकवाड मळा येथील व्यावसायिक ईश्वर संकुल येथे अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. प्रतीक कुमार अॅण्ड कंपनी, अक्षय एम्पोरियम, साईराम सेल्स अॅण्ड सर्व्हिसेस, सायंतारा, मोबाइल रिपेअरिंग, बालाजी इस्टेट कन्सल्टन्सी आदि सात दुकानांपुढील अनधिकृत पक्के ओटे व शेड आदिंचे अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले. तसेच ईश्वर संकुलच्या गच्चीवर क्वालिटी स्वीट््स या दुकानाच्या असलेल्या पत्र्याच्या शेडमधील कारखानादेखील काढण्यात आला. गायकवाड मळा रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्यामुळे सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असते.
जगताप मळा पाईन्स सोसायटी येथे मोजेस यांच्या मालकीचे वाहन पार्किंगसाठी असलेले अनधिकृत पत्र्याचे शेड व वीट बांधकाम तसेच जेलरोड पंचक भैरवनाथ नगर येथे रस्ता असलेल्या जागेवर टाकण्यात आलेले पक्के तार कम्पाउंड जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले. नाशिकरोड परिसरात मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू करताच अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणून गेले आहे. सदर मोहीम मनपा सहायक आयुक्त सोमनाथ वाडेकर, विभागीय अधिकारी कुसूम ठाकरे, विभागीय अधीक्षक सुधाकर वसावे, सहायक अधीक्षक एस.टी. कारवाल, अर्जुन भावले, कैलास भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. (प्रतिनिधी)