‘सामूहिक प्रयत्नांमुळेच दुसरी पर्वणी यशस्वी’
By Admin | Updated: September 14, 2015 23:52 IST2015-09-14T23:51:36+5:302015-09-14T23:52:08+5:30
‘सामूहिक प्रयत्नांमुळेच दुसरी पर्वणी यशस्वी’

‘सामूहिक प्रयत्नांमुळेच दुसरी पर्वणी यशस्वी’
नाशिक : पहिल्या पर्वणीतील टीकेनंतर माध्यमे, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना यांच्याशी चर्चा करून केलेले बंदोबस्ताचे फेरनियोजन, सर्व विभागांसह नाशिककरांचा सकारात्मक प्रतिसाद, सीसीटीव्हीची मोलाची मदत यामुळे दुसरी शाही पर्वणी सुलभपणे पार पडली़ त्यामुळे येत्या शुक्रवारी (दि़१८) होणाऱ्या तिसऱ्या पर्वणीलाही अशाच प्रकारचे नियोजन करण्यात येणार असून, शहरातील सीसीटीव्ही कायमस्वरूपी ठेवण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे पोलीस आयुक्त एस़ जगन्नाथन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़
जगन्नाथन म्हणाले की, पहिल्या पर्वणीनंतर नागरिकांच्या सूचनांचा आदर करून बंदोबस्ताचे फेरनियोजन करण्यात आले़ त्यामध्ये शासनाच्या सर्व विभागातील अधिकाऱ्यांनी चांगले काम केले असून, पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख कर्तव्य बजावल्याने लाखो भाविकांचे सुयोग्य व सुरक्षित नियंत्रण आम्ही करू शकलो. सतरा हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त, रवींद्र सिंघल, मकरंद रानडे, अशोक मोराळे यांच्या अनुभवाचाही फायदा झाला़ पर्वणीचे नियोजन पहिल्यासारखेच असले तरी अंमलबजावणी व नियंत्रण यातील बदलाचा चांगला परिणाम दिसून आला़
पोलिसांना भाविकांसोबत सौजन्याने वागण्याच्या धड्यांचाही चांगला परिणाम झाला़ अपघातातील जखमींची मदत, हरवलेल्या व्यक्तींना प्रत्यक्ष कंट्रोल रूमपर्यंत नेऊन ध्वनिक्षेपकावरून त्यांच्या नातेवाइकांना माहिती देणे, पाण्यात बुडणाऱ्यांचा जीव वाचविणे असे कार्य पोलिसांनी केले़ वृद्ध व अपंग भाविकांसाठी सुरू केलेली बससेवा, रामकुंड परिसरातील भुरट्या चोरांवर नजर ठेवण्यासाठी गुन्हे शाखेचे ७० कर्मचारी साध्या वेषात कार्यरत होते़ त्यांनी १६ संशयितांना ताब्यात घेऊन पाच सोनसाखळ्याही हस्तगत केल्या़
अचानक भाविकांची गर्दी वाढल्यास त्यासाठी राखीव फौजफाटा ठेवण्यात आला होता़ दुसऱ्या पर्वणीला सुमारे ६० ते ६५ लाख भाविकांनी स्नान केल्याचा अंदाज आहे़ तिसऱ्या पर्वणीसाठी भाविक कमी येतील असा अंदाज असला तरी भाविक कितीही संख्येने आले तरी आमची तयारी झाली आहे़ यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंगल, पोलीस उपायुक्त मकरंद रानडे, अशोक मोराळे, एन. अंबिका, माधव तांबडे, संजय दराडे, अविनाश बारगळ, श्रीकांत धिवरे आदिंसह अधिकारी उपस्थित होते़