नाशिक : शासकीय, निमशासकीय सेवेत मुक्त विद्यापीठातून पदवी प्राप्त झालेल्या उमेदवारांची पदवी ग्रा' धरली जावी असा स्पष्ट आदेश शासनाने काढलेला असतानाही, पंजाबराव कृषी विद्यापीठाने आपल्या सरळ सेवा भरतीत मुक्त विद्यापीठातून पदवीप्राप्त कर्मचारी पदोन्नतीस पात्र ठरणार नसल्याचे जाहीर केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सदर प्रकरण आता राज्यपालांकडे गेले असून, त्यांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असल्याचे समजते. नागपूर येथील पंजाबराव कृषी विद्यापीठाने संशोधन सहायक व वरिष्ठ संशोधन सहायक या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पदवी मिळविलेले कर्मचारी या पदोन्नतीस पात्र नसल्याचे स्पष्टच नमूद करण्यात आले होते. पंजाबराव कृषी विद्यापीठाने १४२ पदांसाठी सरळ सेवा भरतीसाठी गेल्या १७ जुलै रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. विशेष म्हणजे, मुक्त विद्यापीठातील पदवीधर हे पदोन्नतीसाठी पात्र असतील असा ठराव कृषी परिषदेने संमत केला होता. या ठरावालाही तिलांजली देण्याचे काम पंजाबराव कृषी विद्यापीठाने केले असल्याचा आरोप कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने केला आहे. या संपूर्ण प्रकरणात कास्ट्राईब कर्मचारी महासंघ कर्मचाऱ्यांसाठी लढा देत आहे.
मुक्त विद्यापीठातून पदवीप्राप्त पदोन्नतीस पात्र ठरणार नसल्याचे जाहीर
By admin | Updated: December 3, 2014 01:35 IST