संतप्त प्रकार : सभा तहकूब करण्यासाठी अजब शक्कल, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी
By Admin | Updated: June 18, 2015 00:20 IST2015-06-17T23:09:20+5:302015-06-18T00:20:13+5:30
मालेगाव महापालिकेत राष्ट्रगीताचा अवमान

संतप्त प्रकार : सभा तहकूब करण्यासाठी अजब शक्कल, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी
मालेगाव : येथील महानगरपालिका महासभा तहकूब करण्यासाठी अधूनमधून ‘राष्ट्रगीताचा’ हत्यारासारखा वापर केला जातो. बुधवारची महासभाही अशाच पद्धतीने तहकूब करण्यात सत्ताधारी पक्षाने यश मिळविले. मात्र अशा पद्धतीमुळे अधूनमधून महासभा तहकूब होत असली तरी त्यात सोयीस्कररीत्या राष्ट्रगीताचा
अवमान केला जातो. त्यामुळे राष्ट्रगीताचा असा अवमान करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.
मालेगाव मनपा महासभेत अजेंड्यावरील ‘अर्थपूर्ण’ व ‘मतलबच्या’ विषयानुसार सत्ताधारी व विरोधी पक्ष सदस्यांचे सोयीस्कररीत्या कधी सख्य तर कधी वैर. सख्याच्यावेळी सत्ताधारी व विरोधी पक्षातील सलोखा बघून शहराचा विकास झाल्याची स्वप्ने सर्वसामान्य मालेगावकरांना पडतात. मात्र जेव्हा सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वैर - मतभेद निर्माण होते तेव्हा सर्वप्रथम अवमान होतो तो राष्ट्रगीताचा. कारण सत्ताधाऱ्यास जेव्हा एखादा विषय रेटून न्यायचा असतो, एखादा विषय ठराव म्हणून मंजूर करायचा असतो, वादग्रस्त विषयांवर चर्चा नकोशी असते आणि नेमक्या त्याचवेळीस विरोधी पक्ष सदस्यांचा लाभ पदरात न पडल्यामुळे, असहमतीमुळे वा विरोधामुळे गोंधळ सुरू असतो. त्यावेळी चर्चा टाळण्यासाठी, जबाबदारी झटकण्यासाठी आणि विरोधी पक्षाचा आवाज अप्रत्यक्षरीत्या बंद करण्यासाठी सत्ताधारी पक्ष व विशेषत: महापौर यांच्याकडून महासभा समाप्ती वा तहकूब करण्यासाठी सभागृहाला विश्वासात न घेता अचानक राष्ट्रगीताची घोषणा केली जाते. एकीकडे सभागृह अध्यक्षाचा आदेश राष्ट्रगीत सुरूकरण्याचा असतो तर दुसरीकडे विरोधी सदस्य सभा सुरू ठेवण्यासाठी आग्रही असतात. विरोधी व सत्ताधारी सदस्यांच्या वादप्रतिवादात मग गोंधळ सुरू राहतो आणि त्या गोंधळातच अचानक ‘जन-गण-मन’ असा राष्ट्रगीताचा स्वर सुरू होतो. त्यामुळे एकीकडे राष्ट्रगीत तर दुसरीकडे सदस्यांचा गोंधळ यात राष्ट्रगीताचा अपमान होतो. ५२ सेकंदाच्या राष्ट्रगीतात किमान १५- २० सेकंद तरी गोंधळ सुरू असतो. आपल्या गोंधळात राष्ट्रगीताचा अवमान होतो याची जाणीव असूनही आतापर्यंत बऱ्याचवेळा महासभेत राष्ट्रगीताचा असा अवमान होत आलेला आहे.
महानगरपालिकेची आजची महासभा तहकूब करण्यासाठी महासभेत सदस्यांचा गोंधळ सुरू असतानाच राष्ट्रगीत सुरू करण्याचे निर्देश महापौर हाजी मोहंमद इब्राहिम यांनी दिले. त्यामुळे एकीकडे सभागृहात राष्ट्रगीत सुरू तर दुसरीकडे सदस्यांचा गोंधळ सुरू, असे वातावरण बघावयाच मिळाले.
यापूर्वी राष्ट्रगीत अवमान प्रकरणी काही जणांनी दाद मागण्याचा प्रयत्न केला आहे. सभागृहातील छायाचित्रण बघून त्यानुसार संबंधितावर कारवाईची मागणी केली आहे. मात्र अद्याप त्यावर कारवाई नाही. त्यामुळे निदान आता तरी याप्रकरणाची दखल गंभीरपणे घेऊन राष्ट्रगीताचा अवमान रोखण्यासाठी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे. (प्रतिनिधी)