सेनेच्या स्थानिक नेत्यांवर नाराजी
By Admin | Updated: February 5, 2017 00:48 IST2017-02-05T00:46:57+5:302017-02-05T00:48:32+5:30
उमेदवारी डावलली : निवडणुकीत ‘काम दाखवू’

सेनेच्या स्थानिक नेत्यांवर नाराजी
नाशिक : शिवसेनेने महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज वाटप करताना निष्ठावंतांवर अन्याय केल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात असून, पक्षाचे अनेक वर्षे काम करूनही उमेदवारी देताना डावलले गेलेल्यांनी आता निवडणुकीत ‘काम दाखवू’ अशी भाषा करण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकीसाठी पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या नातेवाईक, हितचिंतक, समर्थकांना उमेदवारी देण्यात धन्यता मानली, तर उर्वरित ठिकाणी ऐनवेळी पक्षात आगमन झालेल्यांना प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे अनेक वर्षे पक्षाचे काम करूनही प्रत्यक्ष उमेदवारी देताना कार्यकर्त्यांवर पुन्हा झेंडे उचलायचीच वेळ आल्याची भावना व्यक्त केली जात आहे. शिवसेनेचे उपनेते बबन घोलप यांच्या दोन्ही कन्यांना उमेदवारी देऊनही जर घोलप नाराज होत असतील तर ज्या निष्ठावान सैनिकांना उमेदवारी दिली नाही, त्यांनी काय पवित्रा घ्यावा? असा सवाल आता केला जात आहे. विनायक पांडे यांच्याही घरातील दोन व्यक्तींना उमेदवारी देण्यासाठी पक्षाचे स्थानिक नेते तळमळले, ऐनवेळी पक्षात आलेल्या शिवाजी चुंबळे यांच्या घरातही दोन तिकिटे देण्यात आली, मग स्थानिक निष्ठावान सैनिकांनी जायचे कुठे? असा प्रश्न आता विचारला जात आहे. शिवसेनेची उमेदवारी देताना पक्ष निष्ठेपेक्षा उमेदवाराची आर्थिक परिस्थिती, नेत्यांशी असलेले लागेबांधे व निवडून येण्याची क्षमता एवढ्याच गोष्टींना प्राधान्य देण्यात आल्याची टीकाही आता केली जात आहे.