...अन् उलगडले ‘निसटलेले रहस्य’!

By Admin | Updated: October 2, 2015 23:59 IST2015-10-02T23:58:15+5:302015-10-02T23:59:41+5:30

रंगालय : अतुल पेठे यांचे अभिवाचन

... and 'the mysterious secret'! | ...अन् उलगडले ‘निसटलेले रहस्य’!

...अन् उलगडले ‘निसटलेले रहस्य’!

नाशिक : कादंबरीत घडलेला खून... त्यावरून अनेकांवर फिरणारी संशयाची सुई... अन् अखेरीस रहस्याचा झालेला उलगडा... असा रहस्यमय खून प्रकरणाचा हा प्रवास सुमारे दीड तासाच्या अभिवाचनातून नाट्य दिग्दर्शक, अभिनेते अतुल पेठे यांनी असा काही खुलवला की समोर जणू जिवंत नाटकच सुरू आहे असा आभास प्रेक्षकांना व्हावा... प्रत्येक पात्राची बोलण्याची लकब, आवाजातील चढ-उतार, हावभाव पेठे यांनी अप्रतिमरीत्या पेश करीत ‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेले रहस्य’ या दीर्घकथेच्या अभिवाचनाचा प्रयोग रंगवला.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘रंगालय’ या उपक्रमात कुसुमाग्रज स्मारक येथे शुक्रवारी जयंत पवार लिखित ‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेले रहस्य’ या दीर्घकथेच्या अभिवाचनाचा प्रयोग झाला. डी. विश्वनाथ या नावाने रहस्यकथा लिहिणारी व्यक्ती सत्यवान विश्वनाथ डिचोलकर ऊर्फ बाबी या आपल्या लेखक पुतण्याकडून एक रहस्यमय कादंबरी लिहून घेते. या कादंबरीत एका उद्योजकाचा खून होतो. तो कोणी केला असेल, याच्या संशयाची सुई अनेक पात्रांवरून फिरते. अखेरीस या रहस्याचा आगळाच उलगडा होतो. पेठे यांनी विलक्षण ताकदीने हे अभिवाचन केले. परिचय-दृष्टांत, जिज्ञासा, त्या रात्री काय घडले, खून कसा घडला, जोडी नंबर वन, संशय कोणावर आदि प्रकरणांतून कथा पुढे सरकते. काकाचे अडखळत बोलणे, बबन फडचा शांत, संथ संवाद हे सारे बारकावे पेठे यांनी अप्रतिमरीत्या साकारले. एका खून प्रकरणाचा उलगडा करताना या कथेतून सामान्य माणसाच्या उपेक्षित जगण्याकडेही लक्ष वेधण्यात आले.
प्रयोगाची प्रकाशयोजना प्रदीप वैद्य यांची होती. संगीत नरेंद्र भिडे, संजय देशपांडे, अतुल पेठे, अक्षरलेखन कुमार गोखले, रेखाचित्रे तुषार गुंजाळ यांची, तर रंगमंच सहाय्य विशाल राऊत, कृतार्थ शेवगावकर यांचे होते. प्रयोगानंतर कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे सहकार्यवाह अरविंद ओढेकर, अ‍ॅड. विलास लोणारी, लोकेश शेवडे यांच्या हस्ते कलावंतांचा सत्कार करण्यात आला. पेठे यांनी ‘रंगालय’साठी पाच हजारांची देणगी जाहीर केली. पूर्वा सावजी यांनी सूत्रसंचालन केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, महेंद्र दातरंगे, कृष्णा चांदगुडे यांच्यासह प्रवीण काळोखे, रश्मी काळोखे आदि ‘रंगालय’चे सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: ... and 'the mysterious secret'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.