...अन् त्यांनी फेडले सश्रद्ध ‘सुतक’

By Admin | Updated: June 13, 2014 00:20 IST2014-06-12T22:36:05+5:302014-06-13T00:20:29+5:30

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि दिवगंत केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांना गुरुवारी जिल्ह्यात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

... and he's fed up with the 'Sutak' | ...अन् त्यांनी फेडले सश्रद्ध ‘सुतक’

...अन् त्यांनी फेडले सश्रद्ध ‘सुतक’

नाशिक : लोकमत चमू
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि दिवगंत केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांना गुरुवारी जिल्ह्यात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी मुंडे यांचा दशक्रिया विधी पार पाडण्यात आला. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या शेकडो जणांनी क्षौरादि विधी करून ‘सुतक’ फेडले. मुंडे यांच्या आठवणींचा जागरही यावेळी करण्यात आला.
मालेगाव कॅम्प : मालेगाव शहर व तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे दिवंगत ग्रामविकास मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम येथे करण्यात आला. कार्यक्रमात पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी मुंडण करून स्वर्गीय मुंडे यांच्या प्रती आपल्या भावना व्यक्त केल्या.
शहरातील महादेव घाटावर सकाळी १० वाजता पक्षाचे तालुका अध्यक्ष दीपक पवार यांनी पिंडदान केले. घाटावरच दीपक पवार, आबा देसले, नाना मोरे, सुरेश मांडवडे, पंकज शेवाळे, छोटू बोरसे या कार्यकर्त्यांनी मुंडण केले. शहर भाजपाचे माजी अध्यक्ष भरत पोफळे यांनी मनोगत व्यक्त केले व श्रद्धांजली वाहिली. यावेळी शहराध्यक्ष सुनील चौधरी, शरद अहेर, बाळासाहेब शिरसाठ, रामदास बोरसे, प्रकाश सूर्यवंशी, योगेश सोळंकी, सुधाकर ठोके, चिंधा सूर्यवंशी, शालिक देसले, बंटी तिवारी यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
नांदगाव : तालुक्यातील तळवाडे येथे मुंडे यांचा दशक्रिया विधी करण्यात आला. यावेळी २५-३० जणांनी मुंडण केले. भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या अ‍ॅड. जयश्री दोंड यांनी यावेळी मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर संघर्षमय मात करीत मुंडे यांनी राजकारणात आपले समर्थ स्थान निर्माण केले. सर्वसामान्यांच्या वेदनांशी तादात्म्य पावलेला लोकनेता म्हणून त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील, असे दोंड म्हणाल्या. यावेळी सुभाष कुटे, बबनराव दोंड, रावसाहेब दोंड, प्रकाश रोटे, अनिल दोंड, रमेश घुगे, विवेक दोंड, प्रमोद दोंड यांच्यासह २०० जणांनी मुंडण केले.
ममदापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथे लोकनेते कै.गोपीनाथ मुंडे यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ठाण्याचे एकनाथ महाराज सदगीर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला. यावेळी ३०० ग्रामस्थांनी मुंडण केले. वैभव जोशी यांनी विधिवत पूजा केली. या दशक्रिया विधी कार्यक्रमास पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: ... and he's fed up with the 'Sutak'