...अन् सभेची गर्दी ओसरू लागली
By Admin | Updated: October 13, 2014 00:50 IST2014-10-13T00:37:34+5:302014-10-13T00:50:39+5:30
...अन् सभेची गर्दी ओसरू लागली

...अन् सभेची गर्दी ओसरू लागली
नाशिक : गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची सभा तब्बल तीन तास उशिराने सुरू झाल्याने उपस्थित महिलावर्ग मोठ्या संख्येने सभा सुरू होताच परतू लागल्याने भाजपाच्या गोटात चिंता पसरली होती. दुपारी एकनंतर भरगच्च भरलेले दादासाहेब गायकवाड सभागृह शेवटी शेवटी अर्ध्यावर आल्याचे चित्र होते.
भाजपाच्या वतीने दादासाहेब गायकवाड सभागृहात दुपारी बारा वाजता गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मुळातच एक वाजेनंतर सभागृहात गर्दी जमा होण्यास सुरुवात झाली. मधल्या काळात मग सुभाष घिया, दामोदर मानकर, भारती बागुल, गिरीश पालवे, प्रा. कुणाल वाघ, संभाजी मोरूस्कर व उमेदवार देवयानी फरांदे यांना बोलण्याची संधी आयोजकांनी दिली. बोलून बोलून काय बोलणार, अशा मन:स्थितीत वक्त्यांनी मनोगत मांडण्यास सुरुवात केली. देवयानी फरांदे यांनी तर भाषणात अनेक वेळा आक्रमकपणा आणून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. शेवटी व्यासपीठावरूनच त्यांना सांगावे लागले, आता तरी कोणाला तरी बोलायला पाठवा. त्यानंतर रवि कुलकर्णी यांनी जबाबदारी सांभाळली. मात्र दोन मिनिटांतच त्यांनी भाषण आटोपते घेतल्यानंतर मग शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी आपल्या भाषणातून मनसेसह राष्ट्रवादीला लक्ष्य केले. इतकेच नव्हे, तर आमचे दोन आकडी उमेदवार निवडून येतीलच, असा दावा माध्यमांकडे पाहून केला. मात्र जसजशी वेळ वाढत गेली तसतशी सभागृहातील महिला व युवतींची गर्दी ओसरू लागली.
शेवटी शेवटी तर जेव्हा आनंदीबेन पटेल भाषणास उभ्या राहिल्या त्यावेळी सभागृहातील निम्म्याहून अधिक खुर्च्या रिकाम्याही झाल्या होत्या. सभेला तीन तासांचा झालेला विलंबच कार्यकर्त्यांचा अंत पाहून गेल्याची चर्चा उपस्थितांत होती. (प्रतिनिधी)