दुर्लक्ष भोवले अन् कोरोनाचे आगमन झाले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:18 IST2021-04-30T04:18:00+5:302021-04-30T04:18:00+5:30
सिन्नर : पहिल्या लाटेत खूप काळजी घेतली. मात्र, दिवाळीनंतर कोरोनाची लाट कमी झाल्यानंतर विवाहसोहळे, सार्वजनिक कार्यक्रम याबाबत काहीसे दुर्लक्ष ...

दुर्लक्ष भोवले अन् कोरोनाचे आगमन झाले!
सिन्नर : पहिल्या लाटेत खूप काळजी घेतली. मात्र, दिवाळीनंतर कोरोनाची लाट कमी झाल्यानंतर विवाहसोहळे, सार्वजनिक कार्यक्रम याबाबत काहीसे दुर्लक्ष झाल्यानंतर सिन्नर तालुक्यात पहिल्या लाटेपासून कोरोनामुक्त असलेल्या सुमारे १२ गावांमध्ये दुसऱ्या लाटेने शिरकाव केला आहे.
सिन्नर तालुक्यातील १२५ गावांपैकी पहिल्या लाटेत ११३ गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला होता. त्यातील हिवरे, तामकडवाडी, मिरगाव, पिंपरवाडी, सुरेगाव, वल्हेवाडी, कोळगावमाळ, मऱ्हळ बुद्रुक, गुलापूर, निऱ्हाळे, औंढेवाडी, धोंडबार या गावांनी पहिल्या लाटेत कोरोनाला वेशीतच रोखले होते. मात्र, दुसऱ्या लाटेत या गावातील नागरिक कोरोनाबाधित झाले आहेत.
गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण वाढत गेले होते. १२५ पैकी ११३ गावांमध्ये पहिल्या लाटेत कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर कोरोनाची लाट ओसरत आली, असे वाटू लागले. सर्वत्र अनलॉक झाल्यानंतर लोक काहीसे निष्काळजीपणे वागू लागले. सर्वत्र ये- जा सुरू झाली. सार्वजनिक वाहतूकही सुरू झाली. लग्नकार्य व सार्वजनिक कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली. त्यामुळे दुसऱ्या लाटेत उरलीसुरली गावेही कोरोनाच्या जाळ्यात अडकल्याचे दिसून आले.
कोट....
पहिल्या लाटेत चंद्रपूर- खापराळे ग्रुप ग्रामंपचायतीने कोरोनाला वेशीत रोखण्यात यश मिळविले होते. ग्रामपंचायतीने आखून दिलेल्या नियमावलीचे आजही तंतोतंत पालन केले जाते. मात्र, चंद्रपूर गावात एक कोरोनाबाधित आढळून आला. सदर व्यक्ती अन्य आजाराने आजारी होती. मात्र, रुग्णालयात उपचारासाठी गेल्यानंतर तेथे कोरोनाने बाधित झाली असावी, असा अंदाज आहे. गावात कोरोनाने शिरकाव केला नसला तरी गावातील एक व्यक्त बाधित झाली आहे. आम्ही आणखी सतर्क झालो असून, नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.
-अशोक सदगीर, सरपंच, चंद्रपूर-खापराळे
कोट....
‘पहिल्या लाटेत घोटेवाडी-वल्हेवाडी ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत वल्हेवाडी गावात कोरोनाचा शिरकाव झालेला नव्हता. मात्र, दुसऱ्या लाटेत बाधित रुग्ण आढळून आले. गावातील युवक औद्योगिक वसाहतीत कामाला जातात. काहीशी काळजी घेण्यात कमी पडलो. विवाहसोहळे आणि सार्वजनिक कार्यक्रम झाले. शासनाच्या नियमांकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाल्याने वल्हेवाडी गावातही कोरोनाने शिरकाव केला.
-मंजूश्री घोटेकर, सरपंच, घोटेवाडी