आनंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांना वैद्यकीय मदत
By Admin | Updated: January 25, 2016 23:20 IST2016-01-25T23:19:09+5:302016-01-25T23:20:21+5:30
आश्रमशाळा : ६५० विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी

आनंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांना वैद्यकीय मदत
नाशिक : येथील आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि श्रीमती मदनबाई इंदरचंद दुगड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्र समाज सेवा संघाच्या वाघेरे आश्रमशाळेतील ६५० विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी, धनुर्वातासंबंधी लसीकरण आणि औषधांच्या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव सुधाकर साळी यांनी ट्रस्टबद्दल कृतज्ञता व्यक्त करत कार्याचा गौरव केला.
महाराष्ट्र समाज सेवा संघाच्या वतीने वाघेरे येथे आश्रमशाळा चालविली जाते. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वैद्यकीय मदतीची गरज लक्षात घेता आनंद चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक डॉ. आर. आय. दुगड व डॉ. सुषमा दुगड यांनी आश्रमशाळेत जाऊन ६५० विद्यार्थ्यांना धनुर्वाताचे इंजेक्शन दिले. याशिवाय अर्पण रक्तपेढीच्या मदतीने सर्व विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करत त्यांना कार्डचे वितरण करण्यात आले. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आजारपणाच्या काळात लागणाऱ्या अत्यावश्यक औषधांचे किटही दुगड दाम्पत्याने पुरविले. तसेच विद्यार्थ्यांना खेळाचे विविध साहित्य देण्यात आले. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या या दातृत्ववृत्तीला सलाम करत संस्थेचे सचिव सुधाकर साळी यांनी दुगड दाम्पत्याबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी सर्व साहित्य आश्रमशाळेचे मुख्याध्यापक संदीप चौधरी आणि संगीता मालुंजकर यांनी स्वीकारले. यावेळी डॉ. आर. आय. दुगड आणि डॉ. सुषमा दुगड यांनीही मनोगत व्यक्त करत यापुढेही वैद्यकीय मदत कायम सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, डॉ. सुषमा दुगड यांनी विद्यार्थ्यांना हास्ययोगाचे प्रात्यक्षिक दाखविले, तसेच विद्यार्थिनींना त्यांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. नीलिमा चाफेकर, अश्विनी धोपावकर यांच्यासह आश्रमशाळेतील शिक्षक पवार, सौ. चौधरी, सौ. सोनवणे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)