आमदाराची ‘देववाणी’ महापौरा भासे त्सुनामी...!
By Admin | Updated: October 17, 2015 23:34 IST2015-10-17T23:33:51+5:302015-10-17T23:34:28+5:30
फरांदेंचा आयुक्तांना दणका : मोबाइलच्याही पलीकडे गाव पाहण्याचा सल्ला

आमदाराची ‘देववाणी’ महापौरा भासे त्सुनामी...!
नाशिक : महापालिका सभागृहाच्याही सदस्य असलेल्या आमदार देवयानी फरांदे यांनी शनिवारी झालेल्या महासभेत मुकणे पाणीयोजनेच्या प्रस्तावावर बोलताना आयुक्तांच्या ‘स्मार्ट’पणावर उपरोधिक शब्दांत हल्ला चढविला आणि मोबाइलच्याही पलीकडे गावाच्या स्थितीकडे पाहण्याचा सल्ला दिला. आयुक्तांवर शब्दास्त्रांचा मारा होत असताना घायाळ मात्र महापौर झाले आणि आमदारांच्या अमृतमयी ‘देववाणी’मुळे त्सुनामीचा भास झाल्याचे उद्गारले. महापौर विरुद्ध आमदार असा सरळ सामना रंगणार, असे चित्र निर्माण झाले असतानाच आमदार फरांदे यांनी महापौरांच्या निवेदनापूर्वीच सभागृह सोडले म्हणून बरे झाले अन्यथा आकाशवाणी होऊन ‘अर्था’चा अनर्थ घडला असता.
महासभेत मुकणे पाणीयोजनेवर चर्चा झडत असतानाच नगरसेवकही असलेल्या आमदार देवयानी फरांदे यांचे सभागृहात आगमन झाले. सुमारे चार तास सभागृहात बसल्यानंतर आमदारांना बोलण्याची संधी मिळाली आणि फरांदे यांनी चौफेर टोलेबाजी करत आपल्या विरोधकांना लक्ष्य केले. फरांदे यांचा मुख्य रोख होता तो आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यावर. फरांदे म्हणाल्या, आपल्याला स्मार्ट आयुक्त लाभले आहेत. महापालिकेच्या पैशांचा अपव्यय होणार नाही म्हणूनच सरकारने त्यांची नियुक्ती केली आहे. केवळ आयुक्तांनी स्मार्ट होऊन चालणार नाही, तर नगरसेवकांनाही स्मार्ट केले पाहिजे. नगरसेवकांच्या प्रभागातील कामांकडे लक्ष दिले पाहिजे. नगरसेवक संयमी आहेत. त्यांचा अंत बघू नका. स्मार्ट सिटी होईल तेव्हा होईल; परंतु आधी मूलभूत सोयीसुविधा पुरवा. मोबाइलच्याही पलीकडे जाऊन गावाला स्मार्ट करा. केवळ थिंकटॅँक घेऊन बसू नका, असे सांगत फरांदे यांनी गावाची स्थिती जाणून घेण्याचा सल्ला दिला. फरांदे यांच्याकडून आयुक्तांवर वाग्बाण सोडले जात असताना महापौर अशोक मुर्तडक अस्वस्थ झाले आणि त्यांनी मध्येच हस्तक्षेप करत विषयांतर टाळण्याचे सांगितले. महापौरांच्या या हस्तक्षेपावर आमदार चिडल्या आणि आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका, असे सांगत महापौरांनाही कानपिचक्या दिल्या. यावेळी महापौर आणि आमदार यांच्यात पदप्रतिष्ठेवरून शाब्दिक चकमक घडण्यापूर्वीच फरांदे यांनी सभागृह सोडले. मात्र, त्यानंतर महापौरांनी आपल्या निवेदनात आमदाराच्या अमृतमयी देववाणीने कानाला चटके दिल्याची खंत व्यक्त करत १५ मिनिटे समुद्राच्या बाजूने उभा राहिलो तर त्सुनामी येऊन गेल्याची टिपणी केली. स्त्री रुग्णालयाला विरोध करणाऱ्या संजय चव्हाण यांनाही फरांदे यांनी अप्रत्यक्षपणे खडे बोल सुनावले. एखादी चांगली गोष्ट होत असेल तर गुंड आणि विद्वान अस्वस्थ होतात, असा चाणक्याचा दाखला फरांदे यांनी दिला, तर सेना-भाजपात काही आलबेल नसल्याचे सांगणाऱ्या सचिन महाजन यांनाही, ‘आमचे चांगले चालले आहे, तुम्ही तुमच्या घरात डोकावून पाहा’ अशा शब्दांत सुनावले.