इको फ्रेंडली गणेश विसर्जनासाठी अमोनियम बायकार्बोनेट पावडर मोफत
By Admin | Updated: September 12, 2016 01:31 IST2016-09-12T01:26:11+5:302016-09-12T01:31:37+5:30
शुभवर्तमान : पालवी, रेनबो फाउंडेशनचा पुढाकार, पावडर नेण्याचे आवाहन

इको फ्रेंडली गणेश विसर्जनासाठी अमोनियम बायकार्बोनेट पावडर मोफत
नाशिक : शहरात घरोघरी मोठ्या संख्येने विराजमान करण्यात आलेल्या श्री गणेशाच्या प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींपासून होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी पालवी व रेनबो फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे़ अशा प्रकारच्या मूर्तींचे इको फ्रेंडली विसर्जन व्हावे, यासाठी नागरिकांना अमोनियम बायकार्बोनेट पावडर मोफत दिली जाणार आहे़ शहरातील आठ केंद्रांवर ही पावडर मोफत दिली जाणार असून, या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे़
श्री गणेश विसर्जन पाच दिवसांवर येऊन ठेपले असून, गोदावरीसह विविध तलावांमध्ये विसर्जित करण्यात येणाऱ्या प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींमुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते़ विशेष म्हणजे या मूर्ती पाण्यात अनेक महिने विरघळत नाही तसेच त्यातील रासायनिक रंग हे जलचरांसाठी धोकेदायक ठरतात़ मूर्ती लवकर विरघळत नसल्यामुळे त्यांची विटंबनाही होते़ पालवी व रेनबो फाउंडेशनने ही कारणे लक्षात घेऊन इको फ्रेंडली गणेश विसर्जनासाठी पुढाकार घेतला आहे़
सुमारे दीड वर्षाच्या संशोधनानंतर पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती विरघळवण्यात यश मिळवले आहे. पाण्यामध्ये अमोनियम बायकार्बोनेटचे मिश्रण करून त्यात प्लास्टर आॅफ पॅरिसची मूर्ती बुडवून ठेवल्यास ती दोन दिवसांत विरघळते़ जलप्रदूषण रोखण्यासाठी हा चांगला पर्याय ठरणार असल्यामुळे अनेक संस्थांच्या वतीने जनजागृती सुरू आहे़ याच पद्धतीने पोलीस मुख्यालय तसेच एचपीटी महाविद्यालयातील गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले़ पोलीस मुख्यालयात पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल व मान्यवरांच्या उपस्थितीत या पद्धतीने गणेश विसर्जन करण्यात आले़ यावेळी उपस्थितांना या प्रकारचे प्रात्यक्षिकही बघावयास मिळाले
होते़ (प्रतिनिधी)