अंबिकानगर पुलाचा कठडा कोसळला
By Admin | Updated: July 13, 2016 00:47 IST2016-07-13T00:38:45+5:302016-07-13T00:47:19+5:30
अंबिकानगर पुलाचा कठडा कोसळला

अंबिकानगर पुलाचा कठडा कोसळला
सिडको : येथील अंबिकानगर परिसरातील नंदनवन कॉलनी व उमा पार्क सोसायटीला जोडणाऱ्या पुलाचा कठडा कोसळल्याने या पुलावरून वाहतूक करणे धोकेदायक बनले आहे.
तेरा वर्षांपूर्वी बांधकाम व्यावसायिकाने तयार केलेल्या पुलाचा कठडा संततधार पावसामुळे कोसळला. त्यातच पुलाच्या पायाचा भागदेखील कमकुवत झाल्याने हा पूल केव्हा कोसळेल याची शाश्वती नसल्याने या पुलावरून वाहतूक करणे धोकेदायक बनले आहे. मात्र या रहिवासी कॉलनीत जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग असल्याने नाइलाजास्तव धोका पत्करावा लागत आहे.
या कॉलनीत वहिवाटीसाठी दिलेले दोन रस्ते शेजारच्या कॉलनीतील व्यवस्थापनाने भिंत व मंदिर बांधून बंद केलेले असल्याने रहिवाशांना याच पुलाचा वापर करावा लागत आहे. त्यातच पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचा वाद न्यायालयात प्रविष्ट असल्याने या रस्त्याचीही दुर्दशा झाली आहे. येत्या दोन दिवसांत रस्त्याची दुरुस्ती व पर्यायी रस्त्याची व्यवस्था न झाल्यास शनिवारी सहकुटुंब धरणे आंदोलन करण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.
दरम्यान, नगरसेविका रत्नमाला राणे यांच्या वतीने भूषण राणे यांनी पुलाची पाहणी करून नागरिकांशी चर्चा केली. यावेळी परिसरातील रहिवाशी भूषण भामरे, वासुदेव भावसार, संजय मगर, हेमंत शिंदे, सुजित पाटील, कौतिक रौंदळ, प्रवीण भावसार, राहुल चव्हाण, सतीश पाटील आदि उपस्थित होते. (वार्ताहर)