नगरसेवक निधीबाबत अस्पष्टता
By Admin | Updated: June 20, 2017 01:28 IST2017-06-20T01:28:19+5:302017-06-20T01:28:36+5:30
महापालिका : आर्थिक स्थितीनुसार होणार निर्णय

नगरसेवक निधीबाबत अस्पष्टता
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात महापौरांनी ७५ लाख रुपयांचा नगरसेवक निधी देण्याची घोषणा केल्यानंतर सोमवारी (दि.१९) झालेल्या महासभेत महापौरांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सदस्यांनी नगरसेवक निधीबाबतची घोषणा प्रत्यक्ष अमलात आणण्याची मागणी केली. मात्र, आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी महापालिकेची एकूणच आर्थिक स्थिती लक्षात घेऊन उचित निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगत त्याबाबतची अस्पष्टता कायम ठेवली.
सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीने महासभेला सादर करताना नगरसेवक निधी म्हणून ४० लाख रुपयांची तरतूद केली होती. परंतु, महापौर रंजना भानसी यांनी त्यात आणखी ३५ लाख रुपयांची भर घालत निधी ७५ लाख रुपयांवर नेला. महापौरांनी प्रत्येक नगरसेवकाला प्रभागातील विकासकामांसाठी ७५ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली, परंतु निधीची जुळवाजुळव करण्याबाबत प्रशासनाची चिंता वाढविली. महापालिकेची एकूणच आर्थिक स्थिती लक्षात घेता पाउण कोटी रुपयांचा निधी देण्याबाबत प्रशासनाने असमर्थता दर्शविली. एवढा निधी आणायचा कुठून, असा सवालही केला जाऊ लागला. त्यामुळे महापौरांची अडचण वाढली. त्यात महापौरांनी मागील पंचवार्षिक काळातील पराभूत नगरसेवकांचा निधी वळविण्याचा मार्ग सुचविल्याने त्याची पूर्तता करणेही प्रशासनाला अवघड बनले आहे.