राष्ट्रीय रोमिंगपासून अमरनाथ यात्रेकरू वंचित
By Admin | Updated: July 15, 2016 01:02 IST2016-07-15T00:56:04+5:302016-07-15T01:02:45+5:30
नो-नेटवर्क : बीएसएनएलचा गलथान कारभार

राष्ट्रीय रोमिंगपासून अमरनाथ यात्रेकरू वंचित
नाशिक : राज्यासह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक अमरनाथ यात्रेला गेले आहेत. राष्ट्रीय रोमिंगची मोफत सुविधा असल्याने बहुसंख्य नागरिकांनी भारत संचार निगम कंपनीचे (बीएसएनएल) पोस्टपेड, प्रीपेड मोबाइल सीमकार्ड घेतले; मात्र महाराष्ट्र सीमा ओलांडल्यानंतर कुठल्याही प्रकारची रोमिंग सुविधा ग्राहकांना मिळत नसल्याने यात्रेकरूंची मोठी गैरसोय होत आहे.
अमरनाथ यात्रेसाठी शहरासह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने यात्रेकरू गेले आहेत. शनिवारपासून (दि.१३) काश्मीर खोरे धगधगत असून, श्रीनगरपासून तर थेट बालटालपर्यंत निदर्शने आणि जाळपोळ फुटीरवाद्यांकडून केली जात आहे. त्यामुळे पृथ्वीवरील नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये सध्या वणवा पेटला आहे. हिजबुल मुजाहिदीन संघटनेचा कुख्यात दहशतवादी कमांडर बुरहान वाणीला सैन्याने कंठस्नान घातल्यानंतर काश्मीर खोरे पेटले आहे. फुटीरवाद्यांनी सैन्य, पोलीस, यात्रेकरूंना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. यामुळे अमरनाथ यात्रेवरही मोठा परिणाम झाला आहे. अशा तणावपूर्ण स्थितीत बीएसएनलचे सीमकार्ड ‘नो-नेटवर्क’ दाखवित असल्यामुळे शहरासह जिल्ह्यातून गेलेल्या यात्रेकरूंचा संपर्क त्यांच्या नातेवाईक-मित्र परिवारापासून तुटला आहे. दरम्यान, सुरक्षिततेच्या कारणास्तव भारतीय सैन्याने जम्मू येथून काश्मीर, श्रीनगरकडे यात्रेकरूंना जाण्यास सध्या मज्जाव केला आहे. अमरनाथ यात्राही तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. बीएसएनएलच्या सीमकार्डला कुठल्याही प्रकारची रेंज मिळत नसल्याने यात्रेकरू चिंताग्रस्त झाले आहेत. काश्मीर खोऱ्याच्या बातम्यांनी नातेवाईक चिंतेत असताना त्यांच्याशी कुठल्याही प्रकारे संपर्क साधता येत नसल्याने यात्रेकरू हतबल झाले आहेत. (प्रतिनिधी)