अमर तुका झाला...अभंगवाणी : मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध
By Admin | Updated: March 15, 2017 22:52 IST2017-03-15T22:51:38+5:302017-03-15T22:52:29+5:30
नाशिक : ‘जय जय राम कृष्ण हरी...,’ ‘अमर तुका झाला... यांसारख्या एकापेक्षा एक सरस अपरिचित अशा अभंगांच्या बहारदार सादरीकरणाने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

अमर तुका झाला...अभंगवाणी : मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध
नाशिक : ‘जय जय राम कृष्ण हरी...,’ ‘प्रथम आरंभी लंबोदर...’, ‘अमर तुका झाला...’, ‘प्रथम आरंभी लंबोदर...’ यांसारख्या एकापेक्षा एक सरस अपरिचित अशा अभंगांच्या बहारदार सादरीकरणाने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
निमित्त होते, गंगापूररोडवरील डॉ. कूर्तकोटी सभागृहात शंकराचार्य न्यासाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित ‘अमर तुका झाला...’ या अभंगवाणी कार्यक्रमाच्या आयोजनाचे. यावेळी पंडित चंद्रशेखर वझे यांनी प्रारंभी रामकृष्ण हरीची भक्ती करत गणेशवंदना सादर केली. त्यानंतर ‘अमर तुका झाला...’ हे अभंग सादर करताच श्रोते भक्तिरसात न्हाऊन निघाले. उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत अभंगाच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद दिली.
गंगापूररोड परिसरासह शहरातील विविध भागांमधून नागरिक मैफलीला उपस्थित होते. या मैफलीचे वैशिष्ट्य म्हणजे वझे यांनी प्रत्येक अभंगाच्या प्रारंभी त्या अभंगाचा अर्थ अत्यंत मार्मिक पद्धतीने उपस्थिताना समजावून सांगितला.
यामुळे अभंगामध्ये भाविकांची अभिरूची वाढण्यास मदत झाली व श्रोत्यांनी तल्लीन होत मैफलीचा आनंद लुटला. मैफलीच्या पहिल्या टप्प्यात वझे यांनी संत तुकोबारायांच्या साक्षात्कार अवस्थेचे वर्णन विविध अभंगांमधून करण्याचा प्रयत्न केला. तसेच दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात त्यांनी संत शिरोमणी तुकोबारायांनी साक्षात्कारातून साधलेल्या समाज उन्नतीचे वर्णन विविध अभंगांमधून सांगितले.
दरम्यान, तुकोबारायांना विठ्ठल दर्शनाची लागलेली ओढ त्यांनी ‘कर कटावरी तुळशीच्या माळा...’ या अभंगामधून मांडली. वझे यांना ऋग्वेद देशपांडे (तबला), अनिरुद्ध गोसावी (संवादिनी), दिगंबर सोनवणे (पखवाज), ओंकार जोशी (टाळ) यांनी सुरेख साथसंगत केली. निरूपण उमेश भोर यांनी केले. संत तुकाराम यांची जीवनगाथा या कार्यक्रमाद्वारे वझे यांनी विविध अभंगांद्वारे श्रोत्यांपुढे सादर करण्याचा प्रयत्न केला.