संजय पाठक
नाशिक- पालकमंत्रीपदाच्या स्पर्धेत भाजपने बाजी मारत नाशिकची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात यश मिळवले. मात्र, शिंदे सेनेच्या नाराजीनंतर चोवीस तासात नाशिकच्या पालकमंत्रीपदालास स्थगिती देण्यात अली. मात्र, असे असले तरी नाशिकमध्ये येत्या रविवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी गिरीश महाजन यांच्या हस्तेच ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
शासनाने यासंदर्भात स्वतंत्र आदेश जारी केले आहेत. नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी गिरीश महाजन यांच्याबरोबरच माजी पालकमंत्री आणि सध्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्यात स्पर्धा होती. यात गिरीश महाजन यांनी बाजी मारली आणि ॲड. कोकाटे यांना नंदूरबार जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले असले तरी दादा भुसे यांना मात्र कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले नव्हते. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरून परतल्यावरच पालकमंत्रपीदाचा तिढा सुटणार असला तरी नाशिकमध्ये ध्वजारोहण कोण करणार असा प्रश्न होता. त्यामुळे शासनाने पत्रक काढून प्रजासत्ताक दिनी गिरीश महाजन यांच्याच हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल असे सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.