सभागृहाच्या उपकक्षासह पदाधिकाऱ्यांच्या कक्षातही बसवा
By Admin | Updated: June 24, 2015 01:46 IST2015-06-24T01:46:18+5:302015-06-24T01:46:52+5:30
सभागृहाच्या उपकक्षासह पदाधिकाऱ्यांच्या कक्षातही बसवा

सभागृहाच्या उपकक्षासह पदाधिकाऱ्यांच्या कक्षातही बसवा
नाशिक : सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्तावरून पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपल्याची चर्चा असतानाच आता नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यावरून पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपण्याची चिन्हे आहेत. उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी सभागृहातच नव्हे तर सभागृहाच्या उपकक्षात व पदाधिकाऱ्यांच्या कक्षातही सीसीटीव्ही बसविले पाहिजे,अशी प्रशासनाला सूचना केल्याचे कळते. अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांनी सर्वसाधारण सभांमध्ये नेमके काय ठराव होतात? काय निर्णय होतात? याबाबत नंतर इतिवृत्तात घुसखोरी होण्यापेक्षा पारदर्शक कामकाजासाठी थेट सभागृहातच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांनी प्रशासनाला लेखी पत्र दिले आहे. त्यामुळे उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी सभागृहातच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यापेक्षा सभागृहाच्या उपकक्षात (अॅन्टीचेंबर) तसेच जिल्हा परिषदेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या कक्षातही सीसीटीव्ही कॅमेरे बसवायला हवे, अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या वार्षिक अंदाजपत्रकांच्या विशेष सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्तावरून दोघा पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपण्याची चिन्हे आहे. भाजपा-सेनेसह राष्ट्रवादीच्याच काही सदस्यांच्या मदतीने इतिवृत्तात हवे ते बदल करण्याबाबत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रशासनावर दबाव येत असल्यानेच इतिवृत्ताला विलंब होत असल्याची चर्चा आहे. त्यावर तोडगा म्हणून असे वाद वारंवार उद्भवू नये म्हणून सभागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबतचे पत्र अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांनी प्रशासनाला दिले आहे. यातही मागील सर्वसाधारण सभेत आपणच सभागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली होती, असे सदस्य नितीन पवार यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)