मूलभूत सुविधांचीही वानवा
By Admin | Updated: March 11, 2015 00:03 IST2015-03-11T00:03:24+5:302015-03-11T00:03:40+5:30
मूलभूत सुविधांचीही वानवा

मूलभूत सुविधांचीही वानवा
इंदिरानगर : महापालिकेत गेल्या निवडणुकीत नव्याने झालेला प्रभाग म्हणजे प्रभाग ५४ होय. हा प्रभाग मनपाचा सर्वांत लहान प्रभाग म्हणून ओळखला जातो. सुमारे २८०० मतदारांचा हा प्रभाग आहे.
प्रभाग ५४ मध्ये श्रद्धाविहार, श्रद्धा गार्डन, कलानगर, रंगरेज मळा, शिव कॉलनी, पांडवनगरी, सावित्रीबाई वसाहत, पिंगूळबागसह परिसर आहे. या प्रभागात सर्वांत जास्त झोपड्या विखरलेला मतदार आहे. यामुळे प्रभागात विकास झालाच नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
श्रद्धाविहार कॉलनी, पांडवनगरी, परिसरात गेल्या दहा वर्षांपासून अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही, तर काही भागांत अद्याप रस्त्यांचे साधे खडीकरणही झालेले नाही. तसेच कलानगर परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने कृत्रिम पाणीटंचाईस नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. तसेच अवेळी येणाऱ्या पाण्यामुळे महिलावर्गाची गैरसोय होत आहे. पाणीपुरवठ्याची वेळ बदलण्याची मागणी धूळखात पडून आहे.
परिसरात बालगोपाळांसाठी उद्यान आणि क्रीडांगण नाही, तर श्रद्धाविहार कॉलनी व शिव कॉलनीसह काही भागांत असलेल्या मनपाच्या भूखंडांना संरक्षक भिंती बांधण्याचा सपाटाच लावला आहे, परंतु भूखंड विकसित न केल्याने हे भूखंड म्हणजे केरकचऱ्याचे माहेरघर बनले आहे.
घंटागाडी नियमित येत नसल्याने श्रद्धा गार्डनमधील रस्त्याच्या कडेला असलेली धोकादायक विहीर केरकचऱ्याने भरली आहे. हा केरकचरा कुजल्याने घाण व दुर्गंधी पसरून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पांडवनगरी बसथांब्यापासून ते शिवकॉलनी, रंगरेज मळ्यासह परिसरातून गेलेल्या पावसाळी नाल्यात भूमिगत गटारीचे पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे घाण आणि दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच स्वच्छता कर्मचारीअंतर्गत रस्त्यांवर फिरकत नसल्याने बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे.