सर्वच कामांची आता त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात येणार
By Admin | Updated: November 15, 2014 00:41 IST2014-11-15T00:40:34+5:302014-11-15T00:41:11+5:30
सर्वच कामांची आता त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात येणार

सर्वच कामांची आता त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात येणार
नाशिक : सिंहस्थाअंतर्गत शहरात झालेल्या विविध कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत असून, झालेल्या आणि होणाऱ्या अशा सर्वच कामांची आता त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात येणार असून, ठरलेल्या दर्जाप्रमाणे कामे नसतील अथवा त्यात भ्रष्टाचार झाल्याचे उाडकीस आल्यास अशा ठेकेदारांवर कारवाई करणार असल्याचे संकेत आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दिले.
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या कामांसंदर्भात आयोजित बैठकीत त्यांनी हे संकेत दिले. याआधी त्यांनी गेल्या चार दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी केली. त्यात सिंहस्थासाठी बाहेरून येणारी वाहने कोणत्या ठिकाणी थांबतील, त्यांना आत सोडण्यासाठी कोणते रस्ते उपलब्ध आहेत यांसह भाविकांच्या सोयीसाठी बांधण्यात येणाऱ्या ६० घाटांची पाहणी केली. सुरू असलेल्या कामांत घाटावर बांधण्यात येत असलेल्या घाटावरील कॉँक्रिटीकरणात जर दगडी रंग वापरला तर त्याला नैसर्गिकतेचा स्पर्श होईल. त्यामुळे तेथे बदल करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. सिंहस्थाची सुरू असलेली कामे पूर्ण होतील. त्यासाठीच मी आलो असून, निधीची कमतरता भासली नाही तर कामे नियोजित वेळेतच पूर्ण होतील, असा विश्वासही आयुक्तांनी व्यक्त केला. झालेल्या कामांचा दर्जा गुणवत्ता नियंत्रकांकडून तपासून घेतला जाणार असून, त्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयांना सहभागी करून घेतले जाणार असल्याचेही आयुक्त म्हणाले. जमीन अधिग्रहणासंदर्भात भूमिका मांडताना सिंहस्थ मार्गातील सर्वच अतिक्रमणे काढणार असून, ज्या जागांची प्राथमिकता असेल त्याच रस्त्यांच्या अधिग्रहणाला पैशानुसार प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)