All roads in Cidco are dug | सिडकोतील सर्वच रस्ते खोदलेले

सिडकोतील सर्वच रस्ते खोदलेले

ठळक मुद्देनुकसान : खासगी कंपनीचे फायबर आॅप्टिकल टाकण्याचे काम बंद करण्याची मागणी


सिडको भागातील खासगी कंपनीने कामासाठी खोदून ठेवलेल्या रस्त्यांबाबत नागरिकांशी चर्चा करताना आमदार सीमा हिरे. समवेत सुवर्णा मटाले, प्रतिभा पवार आदींसह अधिकारी व परिसरातील नागरिक.


सिडको : संपूर्ण नाशिक शहरात खासगी कंपनीचे फायबर आॅप्टिकल टाकण्याचे काम सुरू असून, सदर कंपनीने शहरातील अनेक चांगल्या पक्क्या रस्त्यावरदेखील मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्याने शहरातील पाणीपुरवठा लाइन, ड्रेनेज लाइन, एमएसईबीच्या भूमिगत लाइनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असल्याने नागरिकांचे जीवनमान बिघडले आहे.
नाशिक मनपाच्या उत्पनात दिवसेंदिवस घट होत असून, मनपाला नागरिकांना चांगले रस्ते, पाणीपुरवठा लाइन टाकणे, ड्रेनेज लाइन टाकणे, वीजतारा भूमिगत करणे यांसारख्या मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देताना निधीचे अतिशय काटेकोर नियोजन करावे लागत आहे.
सिडको कामटवाडे परिसरातील मयुर हॉस्पिटलमागील नागरी वस्तीत खासगी कंपनीच्या ठेकेदाराने पक्का रस्ता खोदकाम करताना एमएसईबीच्या मेन लाइन ब्रेकअप झाल्याने शॉर्टसर्किट होऊन अनेक नागरिकांच्या घरातील विजेची उपकरणे टीव्ही, फॅन, फ्रीज जळून खाक झाले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परिणामी नागरिकांच्या रोषाचा उद्रेक झाल्याने आमदार सीमा हिरे, नगरसेविका प्रतिभा पवार, सुवर्णा मटाले, एमएसईबीचे अति. कार्यकारी अभियंता शृंगारे व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन भेट दिली असता एमएसईबीची मेन लाइन खासगी कंपनीची फायबर आॅप्टिकल टाकताना ब्रेक झाल्याने सदरच्या ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्याचे निष्पन्न झाले असून, या कंपनीच्या संबंधित सुपरवायझरला याबाबतची माहिती देण्यात आली. याबाबत सीमा हिरे यांनी मनपा आयुक्तांना निवेदन देऊन या कंपनीच्या फायबर आॅप्टिकल टाकण्याचे काम बंद करण्याची मागणी केली आहे.

वीजवाहिनी विस्कळीत
शहरात इंटरनेट सुविधा पुरविणाऱ्या खासगी कंपनीच्या फायबर आॅप्टिकल टाकण्याचे काम मंजूर असल्याने या कंपनीने मनपा प्रशासन व एमएसईबी यांच्यासोबत कोणताही समन्वय न राखता रात्रीच्या वेळी चांगले रस्ते खोदकाम केल्याने अनेक ठिकाणी पाणीपुरवठा लाइन, ड्रेनेज लाइन व भूमिगत वीजवाहिनी विस्कळीत झालेल्या आहेत.

Web Title: All roads in Cidco are dug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.