गोणीपद्धती विरुद्ध सर्वपक्षीय ‘एल्गार’
By Admin | Updated: July 30, 2016 23:59 IST2016-07-30T23:56:56+5:302016-07-30T23:59:37+5:30
कांदा उत्पादकांची बैठक : व्यापाऱ्यांच्या धोरणावर टीका

गोणीपद्धती विरुद्ध सर्वपक्षीय ‘एल्गार’
लासलगाव : शासनाच्या नियमनमुक्ती विरोधात कांदा व्यापाऱ्यांनी घेतलेल्या आडमुठे धोरणाच्या विरुद्ध आज लासलगावी खरेदी-विक्री संघात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत कार्यकर्त्यांनी कांदा गोणी मार्केटच्या विरोधात एल्गार पुकारला. सोमवार, दि. १ आॅगस्ट रोजी निफाड तहसीलदार व प्रांताधिकारी यांना या संदर्भात निवेदन देण्यात येणार असून, बुधवारपासून लासलगाव व निफाड मार्केट यार्डात गोणी लिलाव होऊ देणार नाही, अशी भूमिका सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी या बैठकीत जाहीर केली.
या बैठकीला भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश पाटील, नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील, राजाभाऊ शेलार, शेतकरी संघटनेचे बाबासाहेब गुजर, शिवसेना नेते राजाभाऊ दरेकर, शिवा सुरासे, लासलगाव ग्रा. पं. सदस्य डी.के. जगताप, बाजार समितीचे संचालक बबनराव सानप, वैकुंठ पाटील, मोतीराम मोगल, लोकनेते दत्ताजी पाटील बँकेचे संचालक तुळशीराम जाधव, लक्षमण मापारी, खरेदी विक्र ी संघाचे उपाध्यक्ष नितीन घोटेकर, एल.के. बडवर , राजेंद्र दरेकर, राजाराम मेमाणे, भाजपाचे सुरेश दाते, विलास थोरे यांच्यासह निफाड तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी हजर होते. शासनाच्या नियमनमुक्तीविरोधात शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरवून त्यांच्या तोंडून नको ते वदवून घेतले जात आहे. शासनावर दबाव टाकण्याचा व्यापाऱ्यांचा कुटिल डाव असून तो उधळून लावण्यासाठी सर्वानी कंबर कसावी, असे आवाहन ज्येष्ठ भाजापा नेते सुरेश पाटील यांनी यावेळी केले. नानासाहेब पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटले की, संपूर्ण महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनी संप मागे घेतला. त्या काळात नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी आमच्याकडे मोकळ्या लुज मालाचा लिलाव होत असल्यामुळे आम्हाला काही वेळ अधिक द्या, असे म्हणत संप सुरूच ठेवला व नंतर आम्ही निर्णय घेऊ, अशी भूमिका घेतली. मात्र नंतर कांदा गोणीत भरून आणला तरच लिलाव होईल, अशी आडमुठी भूमिका घेतल्याने आठ दिवसांपासून कांदा उत्पादक गोणीच्या गळफासाने घायाळ झाला आहे. गोणी लिलाव झाल्यावर शेतकऱ्यासमोर रिकामी करताना वांधे काढले जातात. गोणी मार्केटच्या विरोधामध्ये आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना अनेकांनी बाजार समितीच्या भूमिकेचा निषेध केला.
शेतकरी बांधवांनी सोमवारी दुपारी २ वाजता निफाड तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने हजर राहावे, असे आवाहन भाजपा नेते सुरेश बाबा पाटील व नाफेचे संचालक नानासाहेब पाटील यांनी यावेळी केले. यावेळी अनिल सोनवणे, निवृत्ती गायकर, शांताराम सोनवणे,किशोर क्षीरसागर, भाजपाचे कैलास सोनवणे, कैलास तासकर, बळीराम जाधव, शिवाजी द्वबर, प्रभाकर बडवर, सुरेश बडवर, विजू आहिरे आदि उपस्थित होते.(वार्ताहर)