अन्य सर्व नोंदी अपडेट; केवळ बळींच्याच नोंदींचा प्रलंबित घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:11 IST2021-06-18T04:11:15+5:302021-06-18T04:11:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : जिल्ह्यात गत गुरुवारपासून पोर्टलवरील बळींची माहिती अपडेट करण्यात येत असून त्यात रुग्णांशी संबंधित अन्य ...

अन्य सर्व नोंदी अपडेट; केवळ बळींच्याच नोंदींचा प्रलंबित घोळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यात गत गुरुवारपासून पोर्टलवरील बळींची माहिती अपडेट करण्यात येत असून त्यात रुग्णांशी संबंधित अन्य सर्व नोंदी आधीपासूनच अपडेटेड आहेत. त्यामुळे जर आधीपासून अन्य सर्व नोंदी अपडेट ठेवता आल्या होत्या, तर केवळ बळींच्याच नोंदी अपडेट न ठेवण्यामागे हेतूपुरस्सर केलेली दिशाभूल किंवा शासनाकडून जाब विचारला जाऊ नये, म्हणून हेतूपुरस्सर केलेला घोळ हेच कारण दिसत असल्याची चर्चा आता आरोग्य वर्तुळात होऊ लागली आहे.
दुसऱ्या लाटेत सर्वच रुग्णालये आणि कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण असल्याचे सगळ्यात मोठे कारण यंत्रणेने पुढे केले होते. त्याचबरोबर फॅसिलिटी ॲप कार्यान्वित न होणे, इंटरनेट कनेक्टीव्हीटीच्या अडचणी, प्रयोगशाळेतून रुग्णांचा आयसीएमआरआयडी वेळेत प्राप्त न होणे, डाटा एंट्री करणारे कुशल मनुष्यबळ आजारी पडणे, मनुष्यबळाची अनुपलब्धता यासारख्या अनेक बाबींमुळे काही रुग्णालयांमार्फत मागील काही महिन्यांतील मृत्यू पोर्टलवर अपलोड केले गेले नसल्याचे कारण जिल्हा प्रशासन आणि जिल्हा शल्यचिकित्सकांकडून सांगण्यात आले होते. तसेच त्याबाबत वेळोवेळी जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून संबंधित स्थानिक यंत्रणांना सूचित करण्यात आले असल्याचा दावादेखील संबंधितांकडून करण्यात आला होता. अशा प्रकारच्या विविध अडचणींची कारणे पुढे करण्यात आली होती.
इन्फो
मृत्यूदर कमी दाखवण्यासाठी केला विलंब
जिल्हा शल्यचिकित्सकांनी नमूद केलेल्या सर्व अडचणी असतानाही नवीन बाधित, बरे रुग्ण, उपचारार्थी बाधित, बरे झालेली टक्केवारी, एकूण निगेटीव्ह, प्रलंबित अहवाल या सर्व बाबी पोर्टलवर अपडेट करणे जर संबंधितांना शक्य झाले तर केवळ बळींची नोंद अपडेट करणेच का शक्य झाले नाही ? की केवळ बळींचीच नोंद पोर्टलवर अपडेट करणे टाळून जिल्हा प्रशासनाने मृत्यू दर कमी दाखवून कोरोना बहराच्या काळात आपली पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानल्याचीच चर्चा सुरू झाली आहे.
इन्फो
माहिती असूनही केले नाही अपडेट
गत सहा महिन्यांच्या काळात दररोजचे नवीन बाधित, बरे रुग्ण, एकूण उपचारार्थी, एकूण बाधित, बरे झालेली टक्केवारी, एकूण निगेटीव्ह, प्रलंबित अहवाल या सर्व बाबी दररोज किंवा दोन-चार दिवसात अपडेट केले जात होते. किंबहुना त्याबाबतची माहिती संकलित करुन ती अपडेट करण्याची जबाबदारीदेखील जिल्हा परिषद आणि जिल्हा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली होती. ही यंत्रणा केवळ या अन्य बाबी फिजीकली घेऊन पोर्टलवर अपडेट करीत राहिले. मात्र, बळींची संख्या फिजीकली माहिती घेऊनही अपडेट करणे टाळले गेल्यानेच नागरिकांची आणि शासनाची प्रचंड मोठी दिशाभूल केली गेल्याचेच त्यातून उघड होत असल्याच्या चर्चेला आरोग्य वर्तुळातच बहर आला आहे.