घरफोड्या करणाऱ्या चौघांना अटक
By Admin | Updated: December 26, 2016 01:57 IST2016-12-26T01:57:36+5:302016-12-26T01:57:52+5:30
मालेगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाची कारवाई; आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता

घरफोड्या करणाऱ्या चौघांना अटक
मालेगाव : शहर परिसरात मंदिर चोरीसह घरफोडी व विविध जबरी चोरीच्या गुन्ह्यातील चौघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून चोरीचा माल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
या प्रकरणी उबेद समसुद्दीन अन्सारी ऊर्फ बड्डे (१९, रा. काकूबाईचा बाग, संगमेश्वर), मोहंमद सुफीयान जमशेद अहमद (२३, रा. अन्वर शाबाननगर आयेशानगर कब्रस्तानजवळ), शेख मोहसीन शेख ऊर्फ भतीजा (२०, रा. अवलीया मशिदीमागे, एकबाल डाबीजवळ), आमीर शहा अरमान शहा ऊर्फ इमू (१८, रा. रमजानपुरा) यांना अटक करण्यात आली आहे. शहरात १८ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास वर्धमाननगरातील जैन मंदिरात अज्ञान चोरट्यांनी प्रवेश करून गाभाऱ्यातील दानपेटी तोडून त्यातील ३५ हजारांची रोकड चोरून नेल्याचा गुन्हा छावणी पोलिसांत दाखल झाला होता.
शहर-परिसरात घरफोड्या वाढल्याने जिल्हा पोलीसप्रमुख अंकुश शिंदे व अपर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून बैठक घेतली. शनिवारी (दि. २४) पथकातील कर्मचारी संगमेश्वर परिसरात गस्त घालत असताना पोलीस निरीक्षक नवले यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी उबेद समसुद्दीन अन्सारी यास ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याचा साथीदार मोहंमद सुफीयान जमशेद अहमद याच्यासह वर्धमाननगरातील जैन मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम चोरून नेल्याची कबुली त्याने दिली. आरोपी मोहंमद सुफीयान यास नवीन बसस्थानक परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
दोन्ही सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याकडे चौकशी केली असता जाफरनगर भागातील मुर्गीवाले यांच्या दुकानातून ९ हजारांची रोकड, आयेशानगर कब्रस्तान परिसरातील दूध डेअरी, रमजानपुरा भागातील डॉ. सईद रजा दवाखान्यात चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. आरोपींच्या ताब्यातून ९ हजार ७०० रुपये व सहा हजार रुपये किमतीची चांदीची नाणी असा एकूण १५ हजार ७०० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला.
शेख मोहसीन शेख ऊर्फ भतीजा (२०, रा. अवलीया मशिदीमागे, एकबाल डाबीजवळ) याच्यासह वरील दोघांनी सटाणा नाका परिसरात गणेश मोबाइल शॉपमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. मंगळवारी (दि. २०) सटाणा नाका परिसरातील गणेश मोबाइल शॉपचे शटर तोडून दुकानातील १४ स्मार्ट भ्रमणध्वनी संच असा एकूण ९१ हजार ८३५ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी कॅम्प पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरील तिन्ही सराईत चोरटे असून, त्यांनी मोसम पूल परिसरात मोटारसायकलवर ट्रिपल सीट येऊन एका इसमाचा भ्रमणध्वनी संच चोरल्याची कबुली दिली. तिघांकडे चौकशी केली असता मोसम पूल, स्टेट बॅँक, म्युनिसिपल हायस्कूल, साठफुटीरोड, पवारवाडी, रौनकाबाद, इंडियन बुटीक परिसरात दुचाकीवर येऊन भ्रमणध्वनी संच चोरल्याची कबुली चोरट्यांनी दिली. याप्रकरणी त्यांचा साथीदार आमीर शहा अरमान शहा ऊर्फ इमू (१८, रा. रमजानपुरा) यास शिवाजी पुतळा परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून १९ भ्रमणध्वनी संच, एक होण्डा शाइन, एक प्लसर दुचाकी असा एकूण एक लाख ७७ हजारांचा माल हस्तगत करण्यात आला. सदर आरोपींना कॅम्प व छावणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)